
सोनगीर : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानी केली आत्महत्या
सोनगीर (तेज समाचार प्रतिनिधि). शिंदखेडा तालुक्यातील सार्वे येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणास कंटाळून सोनगीर गावाजवळील प्रणामी मंदीरा शेजारी सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बापू संतोष भामरे ( पाटील) रा. सार्वे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सार्वे येथील बापू भामरे (पाटील) यांनी सोनगीर बाजारातून फवारणीचे औषध घेतले. किल्ल्याच्या मागील बाजूस पेशवे कालीन तलावाला लागून बेशुद्धावस्थेत वस्तीतील लोकांना आढळून आले त्यांनी गावातील पदाधिकाऱ्यांना माहिती दिली व त्यांना तात्काळ सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारी डॉ कल्पेश वाघ यांनी तपासणी केली असता विषारी औषध प्राशन केले असून प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले त्याना धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.बापू पाटील हे प्रगतशील शेतकरी असून कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे पाटील यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर सकाळी शवविच्छेदन होणार असून दहाला त्यांच्या रहात्या घरापासून अंतयात्रा निघेल. बापू पाटील हे सुनील पाटील व अनिल पाटील यांचे वडील होते.