नागपूर (तेज़ समाचाए डेस्क): निवडणूक शपथपत्रात फौजदारी गुन्ह्यांची माहिती दडवल्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी नागपूर कोर्टाने जामीन मंजूर केलाय. फडणवीस यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे.
फडणवीस यांनी 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 1996 ते 1998 या कालावधीतील 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची गुरुवारी 20 फेब्रुवारी रोजी नागपूर न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीला हजर राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार फडणवीस न्यायालयात हजर झाले. त्यांच्या वतीनं ऍड. सुनील मनोहर यांनी बाजू मांडली. सुनावणीअंती न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
न्यायालयावर विश्वास आहे- फडणवीस
यासंदर्भात फडणवीस यंनी सांगितले की, उपरोक्त दोन्ही प्रकरणे आंदोलनातील आहेत. आपल्यावर एकही वैयक्तीक गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच हे दोन्ही गुन्हे निवडणुकीवर परिणाम करणारे नव्हते. प्रत्येक निवडणुकीत आपल्याला 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. हे सर्व कोण करवते याची कल्पना असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. याप्रकरणी न्यायालयात सर्व मांडणार असून आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.