
प्रत्येक नागरिकाने आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे- जिल्हाधिकारी संजय यादव
धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आरोग्य सेतू हे ॲप डाऊनलोड करून घेत त्यातील माहिती परिपूर्ण भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, आरोग्य सेतू ॲप हे गुगल प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. हे ॲप पूर्णपणे शासकीय असून विनामूल्य उपलब्ध आहे. या ॲपमध्ये स्वयंचाचणीचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये आपल्या आरोग्याविषयीचा तपशील मागितला जातो.
या माहितीच्या आधारे तुमच्यामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे असू शकतात का? याविषयी हे ॲप माहिती देते. या ॲपची निर्मिती वैविध्यपूर्ण रितीने करण्यात आली आहे. एखादा ॲप यूजर आपल्या जवळच्या भागात असेल आणि त्याची कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली असेल किंवा त्याच्यात कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आली, तर त्याची माहिती आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशनद्वारे उपलब्ध होते. त्यामुळे आपण वेळीच सतर्क होवून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळू शकतो.
या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक, शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.