नंदुरबार जिल्ह्यातील चार शहरात आठ दिवस कडक संचारबंदी

Featured नंदुरबार
Share This:

नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर या चार नगरपालीका/नगरपंचायत क्षेत्राच्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून पुढील आदेश येईपर्यंत चारही शहरात 22 जुलैच्या रात्री 12 वाजेपासून ते 30 जुलै 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

या शहरांमधील सरकारी कार्यालये मर्यादीत उपस्थितीत सुरू राहतील तथापि अभ्यागतांना कार्यालयास भेट देण्यास परवानगी नसेल. स्वस्त धान्य दुकानदारांनी वरील कालावधीत धान्य वाटप न झालेल्या लाभार्थ्यांना धान्य वाटपाची सेवा पुरवावी. पेट्रोलपंपावर कोरोना विषयी कामकाज करणाऱ्या शासकीय ओळखपत्रधारक अधिकारी-कर्मचाऱ्यांना तसेच शासकीय वाहनांनाच पेट्रोल किंवा डिझेल देण्यात यावे. या व्यतिरिक्त अन्य वाहनांना पेट्रोल किंवा डिझेल देऊ नये. दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास अनुमती राहील. वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना पूर्वीप्रमाणे पूर्णवेळ सुरू राहतील. सर्व प्रकारची दुकाने, सर्व खाजगी आस्थापना बंद राहील. शासकीय कार्यालये या कालावधीत सुरु राहील. या चारही शहरात केवळ वैद्यकीय कारणासाठी नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा असेल. मात्र यासाठी रुग्णालयातील सबंधीत कागदपत्र सोबत ठेवावे.

सदर कालावधीत अक्कलकुवा व अक्राणी शहरातील सर्व  आस्थापना व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहील. 30 जुलैपर्यंत वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त आंतरजिल्हा प्रवासास पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे. दुकाने आणि आस्थापनांनी 22 जुलै रोजी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आवश्यकतेनुसार करावा.

संसर्ग रोखण्यासाठी विषाणूची संपर्क साखळी खंडीत करणे  आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी शारिरीक अंतराचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदीचे पालन करावे. या कालावधीत अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.  नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी आधीच करावी. वस्तू खरेदी करताना गर्दी करू नये व संचारबंदीचे  पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *