
धुळे शहरावर आता ड्रोन कॅमेराची नजर
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): जिल्ह्यात काही लोक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करत असून करोना या विषाणूला आमंत्रण देत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. शहरातील सेन्सेटिव्ह भागात आता ड्रोन कॅमेराची नजर असून हवाई गस्त घालत प्रशासन नियमांचे उल्लंघन करणार्यांवर नजर ठेवणार आहे.
जिल्ह्यात करोना या विषाणूच्या संक्रमणाचा शिरकाव झाला असून आतापर्यंत करोना बाधेने ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ करोना बाधितांवर शहरालगत असलेल्या हिरे वैद्यकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहे. यामुळे सर्वत्र लोकडाऊन करण्यात आले असून बाधित रुग्ण आढळून आल्या भागात संपूर्ण सील करण्यात आले आहे. धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाला नुकताच ३ कॅमेरे उपलब्ध झाले आहेत. आझाद नगर पोलीस ठाणे हद्दीत अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ राजू भुजबळ, उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे शिवाजी बुधवंत यांनी या हवाई गस्तीचे प्रात्यक्षिक करत शहराचा आढावा घेतला. यावेळी अधिक माहिती अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली.