
प्रवाशांची जबाबदारी सांभाळणारे चालक-वाहक देखील करोना योद्धा- तहसिलदार भाऊसाहेब थोरात
प्रवाशांची जबाबदारी सांभाळणारे चालक-वाहक देखील करोना योद्धा- तहसिलदार भाऊसाहेब थोरात
नंदुरबार (वैभव करवंदकर ): महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरलेली राज्य परिवहन महामंडळाची एसटी अर्थात लालपरी आजही लाखो प्रवाशांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. असंख्य प्रवाशांच्या जबाबदारीचे भान असलेले एसटीचे चालक वाहक देखील खरे कोरोना योद्धा आहेत. असे प्रतिपादन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातर्फे दिनांक 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारीदरम्यान सुरक्षितता मोहीम अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे उद्घाटन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धुळे विभाग भांडारपाल यु.जे. चौरे ,आगार लेखाकार आर. एस. हजारे, वाहन निरीक्षक जे. आर. पाटील ,कार्यशाळा अधीक्षक अशोक वळवी, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे उपस्थित होते. भाऊसाहेब थोरात म्हणाले की, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सारख्या विविध निवडणुका प्रसंगी आणि गत वर्षात कोरोना काळातदेखील रात्रंदिवस बस चालक वाहक यांचे कार्य कौतुकास्पद ठरले. वैद्यकीय अधिकारी, महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रमाणेच चालक-वाहकांनी देखील जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले. ग्रामीण भागासह शहरी भागातील प्रत्येक प्रवाशाला एसटीचे आजही आकर्षण आहे .एसटी चालकाचा हाती 50 प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी असल्याने सुरक्षिता मोहिमे पुरते मर्यादित न राहता सातत्याने नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा असेही थोरात यांनी सांगितले. याप्रसंगी आगारप्रमुख मनोज पवार यांनी सांगितले की, सुरक्षितता मोहिमेअंतर्गत इंधन बचत आणि अपघात विरहित उपक्रमांना प्राधान्य देण्यात येते. गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात नंदुरबार आगारा मार्फत शुन्य टक्क्यावर अपघाताचे प्रमाण आणण्याचे प्रयत्न झाले. भविष्यात देखील चालक वाहकांच्या मदतीने सुरक्षित प्रवासाची हमी देण्यात येईल तसेच लवकरच आगारातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येईल असेही पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार आर.जी. वळवी यांनी मानले .कार्यक्रमाचे संयोजन प्रशांत गुजराथी आणि आगारातील सहकार्यांनी केले. कार्यक्रमास नंदुरबार आगारातील चालक वाहक आणि कार्यशाळेतील महिला पुरुष कर्मचारी उपस्थित होते.