नागपुर : ज्या मित्रावर होता महिलेच्या खुनाचा संशय, त्याचाही सापडला मृतदेह

Featured महाराष्ट्र
Share This:

नागपूर (तेज समाचार डेस्क) : छत्रपति चौकात मेट्रो स्टेशन जवळ मंगळवारी सकाळी एका ४० वर्षींय महिलेचा मृतदेह आढळला होता. त्या महिलेच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा होती. त्या महिलेचा मित्रही अचानक गायब झाला होता. या कारणाने महिलेच्या मित्रावर संशयाचे सावट होते, पण बुधवारी सकाळी सोनेगाव तलावाच्या काठाजवळ महिलेच्या मित्राचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे दोन्ही जणांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला असून प्रताप नगर आणि सोनेगाव पोलिस प्रकरण दाबत असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी मेट्रो स्टेशनजवळ सुमन नंदपटेल (४०) या महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. त्यामुळे तिच्यासोबत काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय होता. सुमनसोबत दीपक भगवान गोहाने (४०) हा युवक राहत होता. दोघेही साई मंदिर परिसरात भीक मागून मेट्रो स्टेशन जवळ राहत होते. दोघेही नेहमी सोबत राहत होते. ते दोघे पती-पत्नी असल्याची अनेकांना माहिती होती.

सुमनच्या मृत्यूनंतर दीपक अचानक गायब झाला होता. तर बुधवारी सकाळी अचानक दिपकचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे दोघांच्याही मृत्यूबाबत संशय निर्माण झाला. मात्र ठाणेदार दिनकर ठोसरे आणि दिलीप सागर हे दोन्ही पोलिस अधिकारी प्रसारमाध्यमांनी विचारलेली माहिती देत नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

सुमन नंदपटेल आणि दीपक गोहाणे या दोघांचे चोवीस तासांच्या आत मृतदेह आढळले. दीपक याने सॅनिटाजर प्राशन केल्याचा दावा पोलिस करीत आहेत. परंतु, घटनास्थळावरून सॅनिटायजरची बाटली आढळली नाही. सुमनच्या मृत्यूनंतर दीपक बेपत्ता होणे आणि त्याचा थेट मृतदेह सापडणे, हे संशयास्पद आहे. मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येणार आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *