18 वर्षांवरील कोरोना लसीकरणावर विघ्न; मुंबई महापालिका आयुक्त म्हणतात…

Featured मुंबई
Share This:

 

मुंबई  (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच केंद्र सरकारने आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचं जाहीर केलं आहे. पण मुंबई महापालिका 18 वर्षांच्यावरील नागरिकांना 1 मे पासून लगेच लस देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये सध्या कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा मर्यादित असल्याने 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देणं शक्य होणार नसल्याचं मत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान 1 मे पासून सर्वांनाच लसीकरण करायला सुरुवात केली तर लसींचा साठा अपुरा पडून लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी होईल, असंही त्यांनी सांगितलं.

कोरोना लसींच्या संदर्भात महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच लसीकरण केंद्रावर गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, असंही आयुक्तांनी बोलून दाखवलं. त्यामुळे या प्रकरणात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रात काल एका दिवसात तब्बल 5 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यामुळे देशपातळीवर महाराष्ट्राने लसीकरणात नवा विक्रमाची नोंद केली असल्याचं स्पष्ट झालं. लसीकरणाला मोठ्या प्रमाणात वेग येत असला तरी काही ठिकाणी मात्र लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकार यामधून कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *