यावल आगारात विरारनगरचे घाण पाणी
यावल आगारात विरारनगरचे घाण पाणी,
30 वर्षात विकसित भागांकडे यावल न.पा.सह, जिल्हाधिकारी, नगरविकास विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष.
विद्यमान नगरसेवकाच्या डोक्याला ताप.
यावल (तेज़ समाचार प्रतिनिधि ): यावल आगाराच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या विरार नगर मधील संपूर्ण रहिवाशांचे वापराचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी यावल आगारात येत असल्याने आगारातील सर्व कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन आगारातील स्वच्छतेच्या मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि आहे. आगारातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना रोज मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे आगार व्यवस्थापक एस व्ही भालेराव जी पी जंजाळ यांनी नगरसेवक अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून पालिकेचे जेसीबी मशीन मागवून साचलेले घाण पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
घटना दिनांक 12 जून 2020 शुक्रवारची असली तरी यावल आगाराच्या बाजूस असलेला विरारनगर हा विकसित भाग गेल्या 25 ते 30 वर्षांपूर्वी विकसित झालेला आहे परंतु तत्कालीन विकासकाने विरारनगर मध्ये कोणत्याही प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नव्हत्या आणि नाही परिसरातली घाण पाण्याचा निचरा, घाण पाणी वाहून जाण्यासाठी गटारी न बांधल्यामुळे संपूर्ण विरारनगर मधील घाण पाणी यावल आगाराच्या आवारात मोठ्या प्रमाणात येऊन घाण पाण्याचे मोठे डबके सतत साचलेले राहायचे त्यामुळे यावल आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह एस.टी. बस वाहक चालक व मेकॅनिक यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने आगार व्यवस्थापक एस. व्ही. भालेराव, जी.पी. जंजाळ यांनी यावल बस स्टँड परिसरातील नगरसेवक अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पाटील यांनी नगरपरिषदेचे जेसीबी मशीन आणून तात्काळ समस्या सोडविली. विरारनगर विकसित करणाऱ्या विकासकाने संपूर्ण विरारनगर मधील घाण पाणी वाहून जाण्यासाठी गटारीची व्यवस्था नियोजनबद्धरीत्या केली असती तर ही वेळ आज आली नसती असे यावल शहरात बोलले जात आहे.
याच प्रमाणे यावल शहराच्या आजूबाजूस गेल्या 25 ते 30 वर्षाच्या कालावधीत एकूण 25 ते 30 ठिकाणच्या विकसित भागात सुद्धा विकासकांनी रस्ते गटारी वीज पाणी इत्यादी प्राथमिक सुविधा उपलब्ध करून न दिल्याने आजच्या विद्यमान नगरसेवकांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विकसित भागात विकासकाने प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत किंवा नाही याकडे तत्कालीन सर्व मुख्याधिकारी व काही जबाबदार लोकप्रतिनिधीचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने विकसित भागातील नागरिकांना आजही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे या सर्व यंत्रणेत यावल नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी जळगाव, नगर विकास विभाग जळगाव यांचे दुर्लक्ष झाले असून वरिष्ठ स्तरावरून यावल शहरातील संपूर्ण विकसित भागातील प्राथमिक सुविधांबाबत चौकशी करून विकासकांवर दंडात्मक कारवाई करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.
गटारीचे बांधकाम करून देणार ?
यावल आगाराचे वरीष्ठ अधिकार्यांकडून परवानगी मिळाली तर यावल आगारात साचत असलेले सांडपाणी वाहून जाण्यासाठी काँक्रीट गटारीचे बांधकाम यावल नगरपरिषदे मार्फत करून देण्यात येईल असे नगरसेवक अतुल पाटील यांनी सांगितले आहे.