
धुळे : शहरात आज 7 नवे रूग्ण-जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 15 वर
धुळे (तेज समाचार डेस्क): करोना विषाणूने धुळे जिल्ह्यात प्रवेश केला असून आज सकाळी सात नवीन करोना बाधित रुग्ण नव्याने आढळले आहे. त्यातील सहा रूग्ण धुळे शहरातील असून एक रूग्ण शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील असल्याचे समजते.जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या ८ वरून १५ वर गेली आहे. तर धुळे शहरात १२ रुग्ण असून शिरपूर, शिंदखेड्यात एक तर साक्रीतील करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसात रुग्णाच्या संख्येत चिंताजनक वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच रहावे बाहेर पडू नये असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शिरपूरातील करोनाग्रस्त महिलेची आई, मुले, पती व घरासमोरील किराणा दुकानदार यांना रात्रीच धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. संबंधित महिलेच्या आईच्या गुडघ्यावर मार्चमध्ये मुंबईला शस्त्रक्रिया झाली होती. तिच्या सुश्रुषेसाठी गेल्यानंतर लॉक डाऊन जाहीर झाल्याने माय लेकी मुंबईत अडकून पडल्या होत्या. १४ एप्रिलला महिलेच्या पतीने रुग्णवाहिकेतून सासू व पत्नीला घरी आणले.मायलेकीची तपासणी करून प्रशासनाने होम क्वारंटाईन केले होते. पत्नीला लक्षणे जाणवू लागल्याने पतीने थेट धुळे गाठले. वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी केल्यानंतर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.