धुळे मनपा वर फडकवणार भगवा , शिवसेनेचा निर्धार

Featured धुळे महाराष्ट्र
Share This:

 

धुळे (तेज समाचार डेस्क). अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणावरुन सध्या सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. राम मंदिराच्या निधीसंकलनावरुनविरोधक भाजपला लक्ष्य करत आहेत. यावरुनचएकेकाळी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही भाजपकडून राज्यात राबवण्यात येत असलेल्या निधी संकलन मोहीमेवरून लक्ष्य केले आहे. शिवसेना  आमदार अब्दुल सत्तार यांनी लक्ष्य केले. भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर  घणाघाती आरोप केला.

ते रविवारी धुळ्यात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या संकल्प मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपला धारेवर धरले. भाजपने विश्वासघात केला नसता तर आज राज्यात युतीची सत्ता असती. भाजप हा गरीबांचा नव्हे तर उद्योगपतींचा पक्ष बनला आहे. राम मंदिराच्या नावाने निधी संकलन करणाऱ्या भाजपने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानायला हवेत,अशी बोचरी टीकाही सत्तार यांनी केली.

महाविकासआघाडीचे सरकार पडण्याची वाट पाहणारे हँग झाले आहेत. गेल्या 16 महिन्यांपासून सरकार आहे त्या ठिकाणी आपले काम व्यवस्थित करत आहेत. माझं नाव सत्तार आहे, मी सत्तेतच राहणार. तसेच आगामी काळात ग्रामपंचायतींच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. आगामी निवडणुकीत धुळे महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. धुळे महानगरपालिकेत शिवसेनेचे 55 नगरसेवक निवडून येतील. शिवसैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याला शिव दरबार भरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्याच्या वाचाळ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमी असून, कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत. बोले तैसा चालेल त्याची वंदावी पाऊले. लॉकडाऊनदरम्यान मंदिरे सुरु करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी धर्म म्हणजे केवळ मंदिर नाही, अशाप्रकारे परिस्थिती उद्धव ठाकरेंनी हाताळल्याचे सांगत, त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *