sanjay-yadav

धुळे: कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातीलप्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत तपासणी करावी: जिल्हाधिकारी संजय यादव

Featured धुळे
Share This:

धुळे जिल्ह्यात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी आपली माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी

धुळे (तेज समाचार डेस्क) : धुळे शहर व जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करावी. धुळे जिल्ह्यात मागील 15 दिवसांत बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची माहिती संकलित करावी. गरज असल्यास त्यांना घरी किंवा इन्स्टिट्यूट मध्ये क्वारंटाइन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वंकष प्रयत्न करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे, या आजाराची प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास तत्काळ जवळच्या सार्वजनिक रुग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले.
धुळे जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 22) कोरोना विषाणूचे 24 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, निवासी जिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), जिल्हा परिषदेचे साथ रोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, उपायुक्त गणेश गिरी, निवासी वैद्यकीय अधिकारी तथा कोरोनाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजकुमार सूर्यवंशी, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, एकाच दिवसांत अचानक मोठ्या संख्येने रुग्ण वाढ होणे ही चिंतेची बाब आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण धुळे शहरातील आहेत. त्यामुळे रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क कॉन्टॅक्टची सखोल तपासणी करावी. जेणेकरुन कोरोना विषाणूचा प्रसार वेळीच रोखता येईल व एकही पॉझिटिव्ह रुग्ण यातून सुटणार नाही. तसेच कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आलेल्या भागात अधिक सतर्कता बाळगत तपासणी करावी. महानगरपालिकेने वॉर्डनिहाय झोनल अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. त्यांचीही मदत घ्यावी. काही ठिकाणी पोलिस विभागाची मदत घ्यावी. त्यासाठी पोलिस विभागाने स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करावा. पोलिसांनी सी.डी.आर.च्या (कॉल डेटा रेकॉर्डर) माध्यमातून कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या प्रवासाची माहिती संकलित करावी व आरोग्य विभागाला द्यावी. कंटेन्मेन्ट झोनमधील अधिकाधिक नागरिकांची थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटरने मनपा वैद्यकीय पथक मार्फत तपासणी करावी. त्यात कोरोना विषाणूची प्राथमिक लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांची रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. मनुष्यबळ, साधनसामग्रीची आवश्यकता भासल्यास निदर्शनास आणून द्यावे.
गेल्या काही दिवसांत धुळे जिल्ह्यात बाहेरगावाहून नागरिक मोठ्या संख्येने आले आहेत. अशा व्यक्तींनी आपली माहिती जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या गुगल लिंकवर भरावी. ही गुगल लिंक जास्तीत जास्त नागरिकांपयत स्थानिक प्रशासनाने व्हॉटसअॅप तसेच इतर माध्यमातून पोहचवावी व त्याचा जास्तीत जास्त उपयोग करावा. पोलिसपाटील, लोकप्रतिनिधी, सजग नागरिकांनी आपापल्या परिसरात बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींची माहिती या माध्यमातून द्यावी. बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींना गरजेनुसार होम किंवा इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाइन करावे. तसेच नागरिकांची एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. सर्दी, खोकला, ताप अशी प्राथमिक लक्षणे असल्यास तत्काळ जवळच्या सार्वजनिक रुग्णालयात जावून औषधोपचार करून घ्यावेत. जेवढ्या लवकर इलाज सुरू होतील तेवढे लवकर बाधित व्यक्ती बरे होण्याचे प्रमाण जास्त असेल. मात्र, उपचारासाठी उशीर केल्यास ते जीवितास घातक ठरू शकते. याशिवाय नागरिकांनी सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनेटायझरचा नियमितपणे वापर करावा. त्यामुळे कोरोना विषाणूची साखळी तुटण्यास मदत होईल, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले.
महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. गिरी यांनी सांगितले, कंटेन्मेन्ट झोनसाठी वेगळे पथक गठित करण्यात आले आहे. तसेच वॉर्डांसाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी तीन कर्मचारी नियुक्त केले आहेत. अधिष्ठाता डॉ. रामराजे यांनी रुग्णालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या औषधोपचारांची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी मार्गदर्शन केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *