sanjay-yadav

धुळे: कोरोना विषाणू बाधितांच्या संपर्कातीलव्यक्तींच्या तपासणीसाठी मोहीम राबवावी: जिल्हाधिकारी संजय यादव

Featured धुळे
Share This:

धुळे: कोरोना विषाणू बाधितांच्या संपर्कातीलव्यक्तींच्या तपासणीसाठी मोहीम राबवावी: जिल्हाधिकारी संजय यादव

रुग्ण वाढीची संभाव्य वाढ लक्षात घेवून आठवडाभरात उपाययोजनांची पूर्तता करावी

धुळे (तेज समाचार डेस्क): धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येचा वेग काळजी वाढविणारा आहे. त्यामुळे कोरोना विषाणूबाधित प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या तपासणीसाठी मोहीम राबवावी. रुग्ण वाढीची संभाव्य वाढ लक्षात घेवून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करीत आठवडाभरात साधनसामग्री, मनुष्यबळाची उपलब्धता करून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव  बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर (कोरोना समन्वयक), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, कोरोनाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, तहसीलदार किशोर कदम (धुळे ग्रामीण), साहेबराव सोनवणे (शिंदखेडा), आबा महाजन (शिरपूर), अपर तहसीलदार संजय शिंदे (धुळे शहर) आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चारशेच्यावर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने दक्षता बाळगत सतर्क राहिले पाहिजे. बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवावे. धुळे शहरासह ग्रामीण भागात तपासणी मोहीम व्यापक स्वरुपात राबवावी. त्यासाठी पथकांची संख्या वाढवावी. आवश्यक तेथे खासगी डॉक्टर आणि पोलिसांचेही सहकार्य घ्यावे. तसेच चाचण्यांचे प्रमाणही वाढवावे. महानगरपालिका आणि साक्री येथे स्वॅब घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. मोबाईल रुग्ण वाहिकेच्या माध्यमातून 50 वर्षावरील व्यक्तींची सरसकट आरोग्य तपासणी करून घ्यावी, असेही त्यांनी निर्देश दिले. 

महानगरपालिका आणि नगरपालिकास्तरावर कोरोना ‘वॉर रूम’ तयार करून त्याचा दैनंदिन आढावा घ्यावा. कोरोना विषाणूचे रुग्ण वाढीमागील कारणांचा सखोल शोध घेत ‘वॉररूम’मध्ये चर्चा करून शास्त्रीय दृष्टिकोनातून उपाययोजना करावी. भारतीय वैद्यकीय परिषदेने (ICMR) आगामी काळात रुग्ण वाढीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर डेडिकेटेड कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ हॉस्पिटलचे आतापासूनच नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची भरती प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करावी. तसेच साधनसामग्रीची खरेदी करावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले. 

धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी काही रुग्णांच्या प्राथमिक तपासणीत त्यांना कोरोनाबरोबरच अन्य विकार असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे कोरोनासह अन्य आजार असलेल्या रुग्णांवर औषधोपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी. तसेच या रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली समित गठित करून तत्काळ अहवाल सादर करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले. 

अधिष्ठाता डॉ. सापळे, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 

नागरिकांनो आजार लपवू नका : जिल्हाधिकारी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आजार लपवू नये. हा आजार लपविल्याने आणि शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे दिसताच जवळच्या रुग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी. तसेच प्रत्येक नागरिकाने आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून घ्यावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *