नागपूर (तेज़ समाचाए डेस्क): देशातील प्रत्येक व्यक्ती आणि संस्थांना देश हिताचा विचार करण्याचा अधिकार आहे. देश हित लक्षात घेऊन जर कुणी बोलत असेल तर ते राजकरणा ठरू शकत नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी बुधवारी नागपुरात केले.
पश्चमि नागपूर नवयुवक मंडळातर्फे स्थानिक पांडे-ले-आऊट परिसरातील बास्केट बॉल मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलताना जोशी म्हणाले की, आपल्या देशात अनेक वर्षांपासून एक चुकीची कल्पना जोपासली जाते. त्यानुसार देशाबद्दल विचार करणे याला राजकारण म्हंटले जाते. जर देशात एखादी घटना घडली किंवा सीमेवर काही वाईट घडत असेल तर त्याबाबत बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. देशहिताची चिंता आणि चिंतन याला राजकारण संबोधणे पूर्णपणे चूक असल्याचे भय्याजी जोशी यांनी सांगितले.
याप्रसंगी सरकार्यवाह म्हणाले की, समाजातील काही लोक संघाला राजकीय म्हणतात. परंतु, संघ राजकारण करीत नाही. तसेच संघातील कुणीही कधी निवडणूक देखील लढवलेली नाही आणि भविष्यातही लढवणार नाही. संघात सरकार्यवाह हे निवडून आलेले असतात. परंतु, ती निवडणूक कधी होते हे कुणाला कळत देखील नाही. देश हिताबद्दल संघाने बोलायचे नाही का, देशाच्या गरजा आणि सैन्याची आवश्यकता यावर बोलणे हे राजकारण कसे होऊ शकते असा प्रश्न जोशी यांनी उपस्थित केला. तसेच जे तुम्हाला आवडते तेव्हढेच बोलायचे का असा सवाल संघावर राजकारणाचे आरोप करणा-यांना त्यांनी यावेळी विचारला.
यावेळी एस. गुरुमूर्ती लिखीत “श्री गुरुजी” या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे जोशी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. राजकीय व्यवस्थेवर विचार मांडताना जोशी म्हणाले की, पूर्वीच्या काळी जगात राजेशाही होती. परंतु, जगातील इतर देश आणि भारतीय राजांची शासन पद्धती यात फरक होता. वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे स्वतःला प्रधान सेवक मानतात त्याप्रमाणे भारतीय राजे देखील मानत असत. भारतीय राजांच्या वरती धर्मदंड होता. त्यामुळेच ज्या पद्धतीने परदेशातील राजकीय सत्ते विरोधात जनतेची आंदोलने झाली तशी भारतात झाली नसल्याचे जोशी यांनी सांगितले.
पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने द्वितीय सरसंघाचालक गोळवलकर गुरूजी यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा आढावा घेताना भय्याजी म्हणाले की, डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने जे बीजारोपण केले होते त्याचा पुढील 33 वर्षात गुरूजींनी वटवृक्ष बनवला. संघाला वैचारिक अधिष्ठान प्रदान करण्यात गुरूजींचा सिंहाचा वाटा होता. देशाची फाळणी, दंगली, गांधी हत्या आणि त्यामुळे आलेली संघ बंदी अशा कठीण काळात गुरुजी यांनी संघ कार्य चालविले. तसेच कठीण प्रसंगी न डगमगता काम करणारे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवल्याचे जोशी यांनी नमूद केले. आपल्या जीवनकाळात गोळवलकर गुरुजींनी भाषावार प्रांतरचनेचा विरोध केला होता. वर्तमानात त्याचे दुष्परिणाम पुढे येतातहेत. भाषेवरून राज्या-राज्यांमध्ये संघर्ष सुरू आहेत. महाराष्ट्र –कर्नाटक वाद सर्वश्रुत असून आंध्रप्रदेश आणि तेलंगणा दोन्ही राज्यांची भाषा एक असून देखील त्यांच्यात खटके उडत आहेत. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात देखील एकच भाषा असून सुद्धा वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
काही गोष्टी स्वयं प्रेरणेने केल्या जाव्यात
प्रत्येक व्यक्ती ने समाज जीवनात काही बंधने पाळली पाहिजे ती बंधने शासनाच्या दंडुक्यानेचे पाळावे असे नाही तर आपण ती बंधने स्वतःहुन पाळली पाहिजे सर्वाना समान संधी असली पाहिजे, मात्र त्याला मर्यादा आहे व्यक्ती स्वातंत्र्य।पण काहीही बोलणार का, आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याने देशाचा नुकसान होणार नाही हे महत्वाचे आहे त्यामुळे दुराचार, भ्रष्टाचार , हिंसाचार होऊ नये असे जोशी यांनी सांगितले.