पाचोरा रुग्णालयात अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची अवहेलना

Featured जळगाव
Share This:
पाचोरा (सुरेश ताम्बे) :- येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन दिवसापासून एक अनोळखी मृतदेह दाखल करण्यात आला असून त्याची अवहेलना होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील सामान्य वार्डात गेल्या दोन दिवसांपुर्वी एक बेवारस मृतदेह दाखल करण्यात आला. रुग्णालय प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या मृतदेहाकडे कुणीही गांभीर्याने बघण्यास तयार नाही. त्यामुळे सदर मृतदेह अक्षरश: कुजला असून त्याची दुर्गंधी परिसरात मोठ्या प्रमाणात पसरली असून रुग्णांमधे याविषयी तिव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
ग्रामीण रुग्णालयात शहरासह तालुक्यातून विविध व्याधींचे रुग्ण येत असतात. आधीच कोरोना या विषाणूमुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. तशातच हा मृतदेह गेल्या दोन दिवसापासून पडून आहे. रुग्णालय प्रशासकीय यंत्रणेच्या उदासिनतेमुळे या मृतदेहाकडे बघण्यास कुणाला वेळ नाही की मुद्दाम त्या मृतदेहाची अवहेलना करण्यात येत आहे हे समजणे अवघड असल्याचे या निमित्ताने बोलले जात आहे. या मृतदेहामुळे रुग्णालयासह परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे याचे भान कुणाला नसल्याचे दिसून येत आहे.
लहान बाळांना डोस पाजण्यासाठी आलेल्या माता व बालकांना तसेच इतर रुग्णांना याचा वाईट अनुभव आज आला. हा प्रकार आरोग्यास घातक असून लक्ष देणे गरजेचे आहे. या दुर्गंधीमुळे चक्क रुग्णालय कर्मचारी तसेच रुग्णांना देखील दोन ते तिन तास बाहेर ताटकळत बसावे लागले. सदर मृतदेह तात्काळ उचलण्यासाठी पोलिसांकडून नगरपालिकेला पत्र देण्यात आले आहे. तरीदेखील या प्रकाराकडे कानाडोळा करण्यात आल्याचे समजते.
स्लिपर कर्मचा-यांचा हा निव्वळ कामचुकारपणा असल्याचे या घटनेतून उघड होत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी साफसफाई कर्मचा-याची चांगलीच कानउघाडणी केली असल्याचे समजते. तरीदेखील साफसफाई कर्मचा-यांची आपली मनमानी सुरुच असल्याचे दिसून येत आहे. अशा कर्मचा-यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *