जुन्या सहकाऱ्याचे निधन, कुटुंबियांचे सांत्वन करतांना पवारांच्या डोळ्यात अश्रू

Featured महाराष्ट्र
Share This:

 

पुणे  (तेज समाचार डेस्क): : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे जुने सहकारी संपतराव जेधे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच पवारांनी थेट आंबवडे गावात जाऊन कुटुंबाची आणि ग्रामस्थांची भेट घेतली. संपतरावांच्या निधनाबद्दल शरद पवार यांनी सहवेदना व्यक्त केल्या. यावेळी शरद पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तसंच संपतरावाच्या कुटुंबीयांना कोणतीही अडचण आली तरी मी मदतीसाठी तत्पर असेन, असा शब्द पवार यांनी दिला.

“संपतराव माझ्यासोबतच 1978 साली आमदार झाले आणि त्यांनी सदैव मला साथ दिली. प्रसिद्धीपासून दूर राहून मला साथ आणि शक्ती देणारे असे जे सहकारी माझ्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिले त्यामध्ये संपतरावांचे स्थान अग्रभागी राहील. सत्ता असो वा नसो त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत मला साथ दिली”, अशा भावना व्यक्त करताना पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

“संपतरावांनी सरकारकडे जे काही मागितले ते मतदारांसाठी, जनतेसाठी मागितले. स्वतःसाठी फक्त पंढरपूर मंदिराच्या कमिटीवर नेमण्याची इच्छा व्यक्त केली. तिथे पांडुरंगाची आणि उन्हातान्हात पंढरीला येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा घडावी, ही त्यांची मनोमन इच्छा होती”, अशा संपतरावांबद्दलच्या आठवणी पवारांनी जागवल्या.

“संपातरावांसारखी निस्वार्थी, जिवाभावाची माणसे हा आपला ठेवा असतात. संपतरावांच्या रूपाने हा ठेवा गेल्याचं मला दु:ख आहे. गावकऱ्यांना एवढेच सांगणे आहे की संपतरावाच्या कुटुंबाची त्यांनी काळजी घ्यावी. काहीही अडचणी आल्यास मला कळवावे, मी त्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असेन”, असा शब्द पवारांनी यावेळी दिला.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *