नागरिकांमध्ये या कोव्हिड 19 बाबत अधिक जनजागृती करावी – ॲड.के.सी.पाडवी

Featured नंदुरबार
Share This:

नंदुरबार (वैभव करवंदकर) जिल्ह्यातील कोव्हिड 19 संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नागरिकांमध्ये या आजाराबाबत अधिक जनजागृती घडवून आणावी आणि प्रतिबंधीत क्षेत्रात संचारबंदीची अंमलबजावणी कठोरतेने करावी. असे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.

कोरोनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि अविश्यांत पांडा, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते.

अँड. के.सी.पाडवी म्हणाले की , बाहेर गावाहून येणाऱ्या व्यक्तिंकडे विशेष लक्ष देण्यात यावे. तसेच प्रतिबंधीत क्षेत्रात संपर्क साखळीचा शोध आणि नियमांच्या अंमलबजावणीबाबत योग्य नियोजन करण्यात यावे. स्वॅब तपासणीसोबत संसर्गावर नियंत्रण आणणे महत्वाचे आहे. कोरोनाबाबत जनजागृतीवर भर देण्यासोबतच सूचनांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी.

लग्नकार्यासाठी होणारी गर्दी कमी व्हावी यासाठी ग्रामीण भागात नागरिकांचे प्रबोधन करण्यात यावे. गावात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बैठकीचे आयोजन करीत काही ज्येष्ठ नागरिकांकडे जनतेशी संवाद साधण्याची जबाबदारी देण्यात यावी. वाहनाने लग्नासाठी जाणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाय योजावेत.

शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांसाठी शहरात यावे लागू नये यासाठी रेशन दुकानांच्या माध्यमातून कृषी निविष्ठा वितरीत करण्याचे नियोजन करण्याबाबत प्रयत्न करावा. खताच्या योग्य वापराविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी. युरीयाच्या उपलब्धतेबाबत आपण स्वत: कृषीमंत्र्यांशी चर्चा केली असून युरियाचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होईल, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना इतरही खतांच्या वापरासाठी प्रोत्साहीत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्र्यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा तालुकानिहाय आढावा घेतला. जिल्हा प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करीत असून नागरिकांनी कोरोनाच्यादृष्टीने आवश्यक खबरदारी घ्यावी आणि नंदुरबार जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शून्यावर आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना नियंत्रणासाठी शासन पातळीवर आवश्यक सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व यंत्रणांनी संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, असे पालकमंत्री म्हणाले.  प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या असून बऱ्याच बांधित व्यक्ती या एकाच कुटुंबातील अथवा त्यांच्या संपर्क साखळीतील आहेत. जिल्ह्यात प्रत्येक पॉझिटीव्ह रुग्णाची संपूर्ण माहिती घेवून संपर्क साखळी शोधण्यावर भर देण्यात येत आहे. पोलीसांच्या मदतीला लवकरच कोतवाल आणि पोलीस पाटील यांची सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी डॉ.भारुड यांनी दिली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *