
Corona Virus: धुळे जिल्ह्यात आणखी 2 करोना पॉझिटिव्ह- करोना रूग्णसंख्या 21 वर
Corona Virus: धुळे जिल्ह्यात आणखी 2 करोना पॉझिटिव्ह- करोना रूग्णसंख्या 21 वर
धुळे (तेज समाचार डेस्क): धुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसात करोनाबाधितांची संख्या चिंता वाढविणारी असून आज हिरे शासकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या दोन करोना संशयित रूग्णांचा आज मृत्यू झाला आहे. दोघांचेही अहवाल प्रलंबित असून अहवाल आल्यानंतरच ते करोनाबाधित आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. आता प्राप्त अहवालानुसार साक्रीतील आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने धुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २१ वर गेली आहे. आता आणखी दोन सापडलेल्या करोनाग्रस्तांवर हिरे शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.
आज सकाळी तीन जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. या तिघांमध्ये धुळ्यातील एकाचा समावेश आहे. शिरपूर तालुक्यातील अमोदे आणि साक्री येथील एक असे दोघे करोनाबाधीत असल्याचे आढळले होते. आता त्यात भर पडली असून साक्रीतील अजून दोन जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. ३० संशयितांचे स्वॅब अहवाल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी २८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. दरम्यान, करोना विषाणूचा संसर्ग जीवघेणा आहे.
जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आवाहन
धुळे जिल्ह्यातील सर्व रहिवासी बांधवांना कळकळीची विनंती आहे. आपण घरीच थांबावे. अनावश्यक गर्दी करू नका. गर्दी केल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू शकतो. त्याचा ताण आपल्या आरोग्य यंत्रणेवर पडेल. त्यामुळे सर्व धुळे जिल्हावासीयांनी घरीच राहून सुरक्षित राहावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.