कोरोना काळातही पाळला ‘शेजारधर्म’

जळगाव
Share This:

बाधित कुटुंबातील दोन निगेटिव्ह बालकांचा केला सांभाळ

संदीप माळी : ‘शेजारधर्म’ विषयी समाजात आपण अनेक चांगले – वाईट अनुभव ऐकत असतो. बहुतेकांचा अनुभव वाईट असला तरी सध्या कोरोनाच्या काळात मात्र अशा शेजारधर्म आणि माणुसकी पाळण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कोरोनाबधित कुटुंबातील निगेटिव्ह आलेल्या दोन बालकांचा सांभाळ करीत शेजार्‍यांनी खर्‍या अर्थाने शेजारधर्म निभावल्याचा प्रत्यय यावल तालुक्यातील साकळी येथे आला.

साकळी येथे कोरोनाबाधितांची संख्या सव्वाशेपर्यंत पोहचली असून त्यातील चार-पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला आहे. सुमारे १५ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. गावातील भवानी पेठ या भागात कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे सर्वत्रच भीतीचे वातावरण आहे.

येथील एका परिवारातील सदस्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांनी यावल येथील शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन तपासणी केली. त्यात कुटुंबातील सदस्यांपैकी पती – पत्नी, मुलगी आणि वृद्ध आजीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर १३ वर्षाच्या जुळे मुलगा आणि मुलगी मात्र निगेटिव्ह असल्याचे आढळले. अशा स्थितीत या लहान बालकांकडे कोण बघणार ? ते कसे राहणार? त्यांचे पालन-पोषण कोण करणार? असे अनेक प्रश्न या कुटुंबासमोर उभे राहिले. त्यावर या दोघांना नातेवाईकांकडे जळगावला पाठवावे, असे ठरले. परंतु मुले बाहेर असल्याने त्यांची आई – बाबाला चिंता राहील हे लक्षात येताच शेजारच्या विनायक महाजन आणि विलास पवार यांनी पुढाकार घेत या मुलांचा १० दिवस सांभाळ करण्याची तयारी दाखविली.

सध्या कोरोनाबाधित कुटुंबातील सदस्य फैजपूर-न्हावी कोविड सेंटरला उपचार घेत आहेत. या आठवड्यात या परिवारातील चार सदस्य बरे होऊन घरी येतील. याकाळात ही बालके मात्र शेजार्‍यांकडे अत्यंत सुरक्षित वातावरणात आहेत.

लवकर उपचार घेतल्यामुळे होणार बरा…
गल्लीत कोरोनाचे रुग्ण आढळत होते. त्यावेळी थोडी सर्दी आणि ताप जाणवत होता. त्यामुळे परिवारातील सर्वांनी कोरोणाची तपासणी करून घेतली. लवकर निदान व उपचार झाल्याने त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. तसेच घरातील व्यक्तींना काहीच लक्षणे नसूनसुध्दा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. उपचार वेळेवर होत असल्याने दोन दिवसांत घरी परत येऊ असा विश्‍वास त्यांना आहे.

कोरोनाच्या काळात एकमेकांना साथ देणे महत्त्वाचे
समाजात कोरोना या विषाणूचा मोठा बाऊ केला जातो. कोरोनाबाधित व्यक्तीकडे तसेच त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर्स किंवा नर्स यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही बदलत आहे. नातेवाईकसुद्धा कोरोनाच्या भीतीमुळे एकमेकांपासून दूर असतात. याकाळात शेजारधर्म जपत या दोन निरागस मुलांचा विवेक महाजन आणि विलास पवार यांचा परिवार जो सांभाळ केला ते माणुसकी अजून जिवंत असल्याचे आणि शेजारधर्म आजही पाळला जात असल्याचे दाखविणारे आहे. कोरोनाच्या या लढाईत एकमेकांना अशाप्रकारे साथ दिल्यास कोरोना संपुष्टात येऊ शकतो, असा संदेश या कुटुंबाने दिला आहे.

गरजूंना मदत करण्याची तयारी…
साकळीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या परिवारातील १ ते १२ वर्ष वयोगटातील निगेटिव्ह मुलगा वा मुलगी असेल आणि नातेवाईक त्यांचा सांभाळ करण्यास असमर्थ असतील त्यांची काळजी घेण्याची माझी तयारी आहे. काही काळ त्यांचा सांभाळ मी नक्की करु शकतो. गरजूंनी ९८२३७६८२०० या क्रमांकावर संपर्क साधावा.
– विलास लक्ष्मण पवार, साकळी,
अध्यक्ष, अ.भा.मराठा महासंघ, यावल

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *