
कोरोना संकट: दैनंदिन जीवनात नव-नव्या वस्तूंचा प्रवेश
कोरोना संकट: दैनंदिन जीवनात नव-नव्या वस्तूंचा प्रवेश
मुंबई (तेज समाचार डेस्क): कोरोना संसंर्गाचा आजार आल्यापासून गेल्या पाच-सहा महिन्यात अनेक नव्या वस्तूंनी आपल्या आयुष्यात प्रवेश केला आहे. मास्क, सॅनिटायझर अशा काही वस्तू शिवाय जगणे कठीण झाले आहे. कोरोनापासून संरक्षण म्हणून अनेक घरांमध्ये विशेष साहित्यांची खरेदी झाली आहे. त्यामुळे आता महिन्याला एक ठराविक रक्कम कोरोना विशेष सामानासाठी आवर्जून बाजूला काढून ठेवावी लागत आहे. सामाजिक वावरात बदल तर झालाच याशिवाय वागणे आणि बोलण्याच्या स्वरुपात ही कोरोनाने बदल करण्यास भाग पाडले आहे. दैनंदिन कामाच्या स्वरूपात कोरोनामुळे अनेक बदल झाले आहेत. घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या खिशात, पर्समध्ये, गाडीत आता सॅनिटायझरच्या आहेत. घरांमध्ये चपला ठेवण्याची जागाही बदलण्यात आली असून दारामध्येच चपला ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. अनेक घरांबाहेर सॅनिटायझर घातलेल्या पाण्याची बादली दररोज भरलेली असते. या पाण्याने पाय धुऊन मगच घरात यायचे, असे नियमच काही गृहिणींनी केले आहेत. बाहेरुन आल्यानंतर न चुकता आंघोळ आणि घातलेले कपडे थेट धुवायला टाकणे, रात्री झोपताना वाफ घेणे हा तर अनेकांचा नित्यक्रम झाला आहे. घराच्या हॉलमध्येही आता इतर शोभेच्या वस्तू बरोबर सॅनिटायझर स्प्रे मानाचे स्थान पटकावले आहे.
घरात प्रत्येक सदस्यासाठी किमान दोन मास्कची खरेदी झालेली आहे. यामुळे आता महिन्याला साबण, हँडवॉश, वॉशिंग पावडर, फिनाइल यांचाही खर्च वाढला आहे. रोज भाजी घेण्यापेक्षा आता आठवड्याच्या भाज्यांची खरेदी एकदाच होत असल्याने भाज्या धुण्यासाठी मोठा टब, बाहेरुन आणलेल्या वस्तू काही काळ तशाच ठेवण्यासाठी जाळीचे ट्रे, सॅनिटायझर फवारणीसाठ स्प्रे यांची खरेदी होत आहे. त्यामुळे आता जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत या वस्तूंनीही स्थान मिळविले आहे. हळद, लिंबू, अद्रक, तुळस आणि इतर साहित्यांनी तयार झालेला काढा घेऊनच सध्या अनेकांचा दिवस सुरु होत आहे. आधी हा काढा आणि नंतर चहा असा बदल करुन घेतला आहे. सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करणारे लवंग, ज्येष्ठमध, सुंठ यासारखे पदार्थ आज अनेकांच्या स्वयंपाकघरात दिसून येत असल्याचे चित्र आहे. थोडासा लागणारा सोडा आता भाज्या धुण्यासाठी वापरण्यात येत असल्याने दर महिन्याला किराणा यादी न चुकता सोडा आणि जास्तीचे मीठ या पदार्थाचा समावेश करण्यात येत आहे.