कोरोना संकटाचा आत्मविश्वासाने सामना करा- नितीन गडकरी

Featured महाराष्ट्र
Share This:

नागपूर (तेज समाचार डेस्क) : जगासह भारताला भेडसावणा-या कोरोना विषाणूच्या संकटाचा आत्मविश्वासाने सामना करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची दक्षता, करावयाच्या उपाययोजना आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी फेसबुक-लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी गडकरी म्हणाले की, जनतेने लॉकडाऊनच्या काळात घरात राहून कोरोनाची साखळी तोडण्यास हातभार लावला पाहिजे. तसेच महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना सोशल डिस्टंन्सींग पाळणे आणि फेस मास्क लावण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोना संकटाशी मुकाबला करण्यात भारत आघाडीवर असून आम्ही वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे जगाच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे कमी नुकसान झाले आहे. परंतु, हा लढा आणखी महिनाभर चालण्याची शक्यता गडकरी यांनी वर्तवली. याकाळात नागरिकांनी संयम आणि आत्मविश्वास कायम ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित केले असले तरी अर्थव्यवस्थेला सावरणे देखील तेवढेच महत्त्वपूर्ण असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यासंदर्भात पंतप्रधान मोदी वेळोवेळी दिशानिर्देश आणि मार्गदर्शन करीत आहेत. त्यासोबतच सरकारने इतर उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने देशांतर्गत मालवाहतूक सुरू केली आहे. त्याचप्रमाणे बंदरांवरून निर्यातीला प्रारंभ करण्यात आलाय. यासोबतच कारखाने पुन्हा सुरू करण्याबाबद परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच 39 आरोग्य/सुरक्षेशी संबंधीत वस्तुंचे उत्पादन सुरू करण्यात आलेय. चीनमधून येणा-या औषधांची आणि कच्च्या मालाची आयात बंद करून भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.
यासोबतच भारतात हायटेक वैद्यकीय उपकरणे तयार करण्याच्या हेतूने 4 मेडिकल डिव्हाईस पार्क सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जपान आणि चीनमधील इन्व्हेस्टमेंट्स बाहेर हलवणार असून अमेरिका व चीनकडून होणारी आयात थांबवणार आहे. त्यामुळे भारतीय उद्योगाला मोठा फायदा होणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. तसेच रस्ते बांधकामाचा वेग दुप्पट करणार असून नवीजोड प्रकल्प आणि जलवाहतूक सुरू करणार आहे. यासोबतच ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्याशिवाय उद्योगांना 10 टक्के अधिक वर्किंग कॅपिटल दिले जाणार असून टॅक्स भरण्याची मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढविली जाणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले जाणार असून येत्या 2 वर्षात 5 लाख कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आलेय. तसेच पेट्रोल, तेलबिया आयात कमी करण्यासाठी ग्रामीण उद्योगांमार्फत बायोडिझेल, इथेनॉल आणि तेलबियांचे विक्रमी उत्पादन करण्यात येणार आहे.
त्यासोबतच दुग्ध, कुक्कुट उद्योग वाढवण्यासाठीही योजना तयार करण्यात आली आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व छपाईच्या कागदांची आयात कमी करण्याच्या दृष्टीने देखील योजना आखली जात असल्याचे गडकरी यांनी सांगितले. कोरोना संकटावर यशस्वीपणे मात करून भारताला 5 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेसह सुपर पॉवर बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *