
धुळे महानगरपालिका हद्दीत 4 जूनपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन: जिल्हाधिकारी संजय यादव
अत्यावश्यक सेवांमध्ये वाढ, मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक
धुळे (तेज समाचार डेस्क): धुळे महानगरपालिका हद्दीत व जिल्ह्यातील अन्य तालुक्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचे (COVID 19) 162 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 19 जणांचा मृत्यू झाला आहे, तर धुळे महानगरपालिका हद्दीत 31 प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी धुळे शहरात महानगरपालिकेच्या हद्दीत महाराष्ट्र शासनाच्या 31 मे 2020 चे आदेश प्रमाणे 2 ते 4 जून 2020 या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. ही संचारबंदी कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांच्या हितासाठीच असून नागरिकांनी घाबरून न जाता संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग पाहता नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून लॉकडाऊनचा फेज निहाय शिथिल करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. धुळे जिल्ह्याला लागू असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात व मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा गावात तसेच धुळे महानगरपालिका हद्दीत व जिल्ह्यातील अन्य तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रसार एका बाधित व्यक्तीपासून अन्य व्यक्तीस संक्रमण होण्याची शक्यता असल्याने जिल्हादंडाधिकारी श्री. यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, फौजदारी प्रक्रिया संहिता नुसार धुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी कोविड 19 विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी आयुक्त म्हणगरपालिका यांनी घोषित केलेले प्रतिबंधित क्षेत्र वगळून ही संचारबंदी लागू राहील.
या संचारबंदीतून रुग्णालये, औषधे विक्रीची दुकाने, सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा व त्या अनुषांगिक सेवा, अतितातडीचे शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा व कायदा सुव्यवस्था हाताळणारी यंत्रणा, बँक यंत्रणा, महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी, दूरध्वनी, इंटरनेट सेवा पुरविणारे अधिकारी व कर्मचारी या अत्यावश्यक सेवा वगळून किराणा दुकाने, शासकीय सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमार्फत वाहतूक व धान्य वाटप, दूध, भाजीपाला व फळे विक्री दुकाने, कृषी विषयक सर्व प्रकारच्या आस्थापना, छत्री, रेनकोट, प्लास्टिक शीट/ कव्हरची दुकाने, वखार (सॉ मिल), कुलर, एसी, पंखे, साहित्याची दुकाने, बांधकाम विषयक सिमेंट, खडी, रेती, स्टील, विटांची आस्थापना, तसेच नामांकित कंपनीचे महानगरपालिका हद्दीतील अधिकृत सर्व्हिस सेंटर केवळ दुरुस्ती व देखभाल प्रयोजनार्थ आस्थापना वगळून इतर सर्व व्यवहार खालील कालावधी व अटीस अधिन राहून बंद करण्यात येत आहे.
कोविड-19 प्रतिबंधित क्षेत्र (Containment Area) वगळून इतर क्षेत्रातील अधिकृत किराणा दुकाने, स्वस्त धान्य विक्रीची दुकाने, भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने, छत्री, रेनकोट, प्लास्टिक शीट/कव्हरची दुकाने, वखार (सॉ मिल), कुलर, एसी, पंखे साहित्याची दुकाने, बांधकाम विषयक सिमेंट, खडी, रेती, स्टील व विटांची आस्थापना तसेच नामांकित कंपनीचे महानगरपालिका हद्दीतील अधिकृत सर्व्हिस सेंटर केवळ दुरुस्ती व देखभाल प्रयोजनार्थ आस्थापना आस्थापना वगळून इतर सर्व व्यवहार खाली दिलेल्या कालावधी व अटीस अधिन राहून बंद करण्यात येत आहेत.
तसेच या कालावधीत चारचाकी वाहनांकरीता 1+2 व्यक्ती व दुचाकी वाहनांकरीता फक्त वाहनचालकांना अत्यावश्यक सेवेकरीताच परवानगी राहील. 3 जून 2020 पासून सायकलिंग/जॉगिंग/रनिंग/वॉकिंग यासारखे वैयक्तिक शारीरिक व्यायामांना सार्वजनिक व खासगी खुली जागा / खेळाचे मैदानांचा वापर सकाळी 6 ते सायंकाळी 7 पर्यंत करता येईल. मात्र, इनडोअर स्टेडिअमचा वापर व सार्वजनिक क्रियाकलाप (Group Activity) करता येणार नाही.
प्लंबर, इलेक्ट्रीशियन्स, पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर्सचा वापर करण्याच्या अटीवर सकाळी 9 ते 5 या कालावधीत सुट देण्यात येत आहे. गॅरेज व वर्कशॉप यांना ग्राहकानुसार वेळ निर्धारित करुन सेवा देण्याच्या अटीवर सूट देण्यात येणार आहे. सर्व शासकीय कार्यालयात 15 टक्के अथवा कमीतकमी 15 कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहील. अत्यावश्यक सेवा गरजे नुसार पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील. कोव्हीड – 19 प्रतिबंधित क्षेत्र (Containment Area) वगळून इतर क्षेत्रातील अधिकृत किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने, छत्री, रेनकोट, प्लास्टिक शीट/कव्हरची दुकाने, वखार (सॉ मिल), कुलर, एसी, पंखे साहित्याची दुकाने, बांधकाम विषयक सिमेंट, खडी, रेती, स्टील व विटांची आस्थापना तसेच नामांकित कंपनीचे महानगरपालिका हद्यीतील अधिकृत सर्व्हिस सेंटर केवळ दुरुस्ती व देखभाल प्रयोजनार्थ आस्थापना, पेट्रोल पंप चालकांसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पावेतो वेळ निश्चित करण्यात आली आहे.
दूध विक्रेत्यांसाठी सकाळी 6 ते रात्री 8 ही वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. या व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी झाल्यास महानगरपालिका व पोलिस प्रशासनाने अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित आस्थापनेवर तत्काळ कार्यवाही करावी. वखार (सॉ मिल), कुलर,एसी, पंखे साहित्याची दुकाने, बांधकाम विषयक सिमेंट, खडी, रेती, स्टील व विटा या व्यावसायकांनी (आस्थापना) ग्राहकांना घरपोच सेवा द्यावी. हा आदेश हा सद्य:स्थितीत व भविष्यात कोव्हीड-19 प्रतिबंधित क्षेत्र घोषित झालेल्या क्षेत्रास लागू राहणार नाही. या (Containment Area) प्रतिबंधित क्षेत्रात कन्टेन्मेंट अधिसूचनेनुसार घोषित प्रतिबंधानुसार अंमलबजावणी होईल. तसेच राज्य शासनाने संपूर्ण राज्यात रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत संपूर्ण संचारबंदी आदेश लागू केलेले आहेत.ते जिल्ह्यातही लागू राहतील. वर नमूद सर्व सूट दिलेल्या आस्थापनाधारकांनी सोशल डिस्टन्सिंगचा/मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. तसे आढळून न आल्यास दिलेली सूट तत्काळ रद्द करण्यात येईल.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) (3) व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय योग्य त्या कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही जिल्हादंडाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.