राज्यातील ‘या’ भागांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार!

Featured मुंबई
Share This:

मुंबई  (तेज समाचार डेस्क):  मागील वर्षभरापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती खूपच गंभीर होती. परंतू, आता कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचं चित्र आहे. रूग्णांच्या संख्येतही घट होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा गोष्टी पुर्ववत सुरू करायचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनामुक्त झालेल्या विभागात पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील कोरोनामुक्त क्षेत्राच्या शाळांनी ठराव करून कोविड निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळा सुरू करण्यात येणार आहे. ज्या गावात आठवी ते बारावी वर्ग सुरु करायचे आहेत त्या गावात किमान महिनाभर आधीपासून एकही कोविड रुग्ण नसावा, अशा सुचना समितीला देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना टप्प्याटप्पाने, वेगवेगळ्या वेळी शाळेत बोलवण्यात येणार आहे. शाळेत शिकवताना महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दोन बाकांमध्ये 6 फुटांचं अंतर ठेऊन, एका बाकावर एकच विद्यार्थी असणार आहे. तर एका वर्गात किमाल 20 विद्यार्थीमर्यादा असणार आहे. पालक शिक्षक बैठका फक्त ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. येत्या 15 जुलैपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

दरम्यान, शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करावे, गर्दी टाळण्यासाठी पालकांना शालेय परिसरात प्रवेश देऊ नये, एकही विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्यास तातडीने शाळा बंद करून मुख्याध्यापकांनी निर्जंतुकीकरण करावे, कोरोनाग्रस्त विद्यार्थ्याला क्वारंटाइन करून उपचार सुरू करावेत, अशा सुचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शासकिय स्तरावर योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *