
शिरपूरचा कबड्डीपटू चुनिलाल पावराची ‘विजेता’व्दारे रूपेरी पडद्यावर धडक
शिरपूर (मीनल खैरनार). आदिवासी भागातील एका सामान्य कुटुंबातील चुनिलाल पावराने आपल्या परिस्थितीशी सामना करीत उच्च भरारी मारताना आपल्या अंगभूत खेळाच्या बळावर चक्क एका चित्रपटात महत्तवाचे स्थान मिळविले आहे. सुप्रसिध्द असे चित्रपट निर्माते सुभाष घई यांचा ‘विजेता’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला़ असून तो पूर्णत: खेळावर आधारित असल्याने त्यामध्ये भूमिका साकारण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील सरावलेल्या खेळाडूंची गरज होती. याच भूमिकेसाठी धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील कबड्डी खेळाडू चुनिलाल पावराची निवड झाली आहे. या चित्रपटात तो रूपेरी पडद्यावर झळकलेला आपल्याला दिसेल.
काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने चुनिलाल पावरा याला ‘आदिवासी रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याची दखल घेत या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी या राष्ट्रीय खेळाडूला संधी देण्यात आली़.
– अनेक दिग्गज कलावंत
‘विजेता’ या मराठी सिनेमात सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार, मानसी कुलकर्णी, माधव देवचाके, तन्वी किशोर, दीप्ती धोत्रे, देवेंद्र आदी दिग्गज कलाकार व अभिनेते-अभिनेत्री मुख्य भूमिका साकारत आहेत. त्यांचासोबत सराव करतांना महाराष्ट्र टीम कॅम्पमधे चुनिलाल पावरा कबड्डीपटू खेळाडू म्हणून एका भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात विविध व्यक्तिरेखेला न्याय दिल्याचे समोर येत आहे. या चित्रपटात सुभाष घईसोबत महाराष्ट्रातील शिरपूर तालुक्यातील कबड्डीपटू चुनिलाल पावराला काम करण्याची संधी मिळाली, ही गोष्ट महत्त्वाची आहे.
‘विजेता’ चित्रपट संपूर्णपणे क्रिडा क्षेत्रावर आधारित आहे, असे या चित्रपटाच्या पोर्स्टरवरून लक्षात आले. या चित्रपटात विविध भूमिका मुख्य कलाकारांनी साकारल्या आहेत. त्यामध्ये पूजा सावंत साकलिंग तर नेहा महाजन रनिंग करताना दिसत आहेत, याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिडा क्षेत्राशी संबंधित फोटोज सुध्दा पोर्स्टसमध्ये बघायला मिळाले. यासोबतच सुबोध भावे, पूजा सावंत आणि नेहा महाजन यांचा हा एकत्रित पहिला चित्रपट आहे.
घरी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या अशा आदिवासी कुटुंबात जन्माला आलेल्या चुनिलाल पावराने कबड्डीतील प्रावीण्याच्या बळावर राष्ट्रीय पातळीवरील प्रो-कबड्डी लीगपर्यंत मजल मारली आहे. त्यांच्या रूपात देशाला एक प्रतिभावान राष्ट्रीय कबड्डीपटू मिळाला. दुर्गम, आदिवासी भागात राहून आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत, त्याने घेतलेली झेप सर्वांना अचंबित करणारी आहे.
शिरपूर तालुक्यात कनगई या दुर्गम आदिवासी भागात शिवलाल व गारीबाई या शेतमजूर दाम्पत्याच्या पोटी १ जुलै १९९७ रोजी चुनिलालचा जन्म झाला. त्याला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्यांच्यासह प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत, त्याने पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण वाघाडी येथील आश्रमशाळेत केले. गरिबीशी दोन हात करीत शालेय शिक्षण सुरू असतानाच त्याला कबड्डीचे वेड लागले. त्याच्या आई-वडिलांनीही त्याला प्रोत्साहन दिले. परिस्थितीमुळे हताश न होता, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या बळावर त्याने कबड्डीतील बारकावे समजून घेतले. आपला खेळ प्रभावी, अचूक करण्याकडे लक्ष दिले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध मानाच्या कबड्डी स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्याने आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हे करताना शिक्षणही सुरू होते. आर. सी. पटेल फार्मसी कॉलेजमधून त्याने डी. फार्म. पूर्ण केले. आपल्या उत्तम खेळामुळे त्याने स्वतःचेच नव्हे, तर आई-वडील, समाज आणि शिरपूर तालुक्याचे नावही राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे.
– प्रारंभ गुजरात वॉरियर्सकडून !
२०१७ मध्ये ‘जस्ट कबड्डी सीझन-४’मध्ये त्याने गुजरात वॉरियर्स संघाकडून खेळताना दमदार खेळ करीत संघाला विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळे देशातील नामवंत प्रशिक्षकांचेही त्याच्याकडे लक्ष वेधले गेले. २०१८ मध्ये ‘जस्ट कबड्डी सीझन-५’मध्ये तो ‘दिल्ली दमदार’ संघाकडून खेळला आणि त्याने संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. चुनिलाल पावरा हा पुणे पायरेट्सचा कर्णधार म्हणून होता. चुनिलाल पावराची ‘कबड्डी लीग सीझन ७’ करिता निवड झाली. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन त्याची प्रो-कबड्डी लीगमध्येसुध्दा निवड झाली.
या युवा, प्रतिभावान, मेहनती आदिवासी कबड्डीपटूला साहित्य अथवा इतर खर्चाची जुळवाजुळव करताना अनंत अडचणी येतात. तसेच त्याचा अंगभूत खेळ आणखी खुलण्यासाठी त्याला उत्तम राष्ट्रीय प्रशिक्षकाचीही नितांत गरज आहे. त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले, तर येत्या काळात ऑलिंम्पिकसारख्या जागतिक स्पर्धेतही चुनिलाल देशाचे नाव नक्कीच झळकवेल यात शंका नाही.