
मोफत लसीकरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता – नवाब मलिक यांची माहिती
मुंबई (तेज समाचार डेस्क): राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर राज्यात सरसकट लोकांना कोरोना लस मोफत द्यायची याबबात राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी घोषणा केल्याने महाविकास आघाडीतील (MVA)बाकी मंत्र्यांमध्ये नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे . यावर आता मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे .
राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय एकमताने झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता, असे मलिक यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी कालच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी मोफत लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्याची घोषणा केली आहे. लस खरेदीसाठी जागतिक निविदा बोलवून जी चांगली लस असेल ती स्वस्त दरात उपलब्ध करुन राज्य सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेणार आहे. यासाठी लवकरात लवकर निविदा काढण्यात येणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
राज्यातील लसीकरणाबाबत मंत्री नवाब मलिक म्हणाले की, १ मे पासून देशभरात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. परंतु १८ ते ४५ या वयोगटाला केंद्र सरकारकडून मोफत लस मिळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. तर, लसीकरणासाठी उत्पादकांनी आपले दर जाहीर केले आहेत. कोव्हिशिल्डचा दर केंद्र सरकारसाठी दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खासगी रूग्णालयांना ६०० रुपये राहणार आहे.