
मुख्यमंत्री आज सातारा दौऱ्यावर; पुरग्रस्त भागाची पाहणी करणार
मुंबई (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाने कोकण व पश्चिम महाराष्ट्राला चांगलंच झो़डपुन काढलं आहे. परिणामी कोकणातील तळिये गावात दरड कोसळुन झालेल्या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागात दौरे करण्यास सुरवात केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा दौऱ्यावर जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे साताऱ्यात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. तर साताऱ्याच्या अनेक भागात पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री साताऱ्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा केला केला. या दौऱ्यात त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्याचबरोबर त्यांनी 2 दिवसात नुकसानीचा अहवाल तयार करून लवकरात लवकर मदत पोहचवण्याचं आश्वासन देखील स्थानिकांना दिलं आहे. नुकसानग्रस्त नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री पुण्याहून साताऱ्याला जातील. पूरस्थिती असलेल्या भागाची हवाई पाहणी करून ते कोयनानगर परिसरात उतरतील. त्यानंतर ते जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळेत उभारण्यात आलेल्या निवासी छावणीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत.