चामोली दुर्घटना 2.70 कोटी घनमीटर हिमकड्यामुळे

Featured देश
Share This:

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): उत्तराखंडमधील चामोली येथे सात फेब्रुवारीला हिमस्खलनात २०० हून अधिक जणांचा मृत्यू किंवा बेपत्ता झाले होत. चामोलीजवळच्या रोंती शिखरावरील तब्बल २.७० कोटी घनमीटरचा महाकाय हिमकडा कोसळून हे हिमस्खलन झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने केला आहे. हे संशोधन ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनाची प्रदेशातील धोके ओळखण्यास धोरणकर्त्यांना मदत होईल. (chamoli glacier burst in Uttarakhand nearly 27 million cubic metres of ice says researchers has reported in the Science journal )

या आपत्तीचे नेमके कारण शोधण्यासाठी जगभरातील ५३ संशोधक एकत्र आले होते. त्यात नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि इंदूरमधील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील संशोधकांचाही समावेश होता. या हिमस्खलनामुळे बर्फ व इतर गोष्टी तसेच पाण्याची एक मोठी भिंतच रोंतीगड, ऋषीगंगा आणि धौलीगंगा नद्यांच्या खोऱ्यात कोसळली होती. नद्यांनी मार्ग वळविल्यामुळे नव्हे तर नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दगड, नुकताच वितळलेला हिमकडा कोसळून पूर आल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला.

हवामान बदलामुळे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडू शकतात असा इशारा संशोधकांनी दिला असून हिमालयाच्या नाजुक वातावरणात विविध प्रकल्पांचा धोकाही त्यांनी अधोरेखित केला आहे. हिमकडा कोसळल्यावर दगड आणि बर्फाचा एका मोठा प्रवाह तयार झाला, त्याने २० मीटर आकाराची शिळा वाहून नेली. एवढेच नव्हे तर नद्यांच्या खोऱ्यांची भिंतही २२० मीटरने उंच झाली.

हाय रिझोल्युशन उपग्रह प्रतिमा, संशोधनासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर आणि उपग्रह रिमोट सेन्सिंगमधील तज्ज्ञांच्या मदतीने आम्ही ही घटना कशी घडली याचा नेमका उलगडा केला. चामोली दुर्घटनेनंतर लगेच आम्ही फ्रेंच सहकाऱ्याच्या मदतीने या आपत्तीच्या उपग्रह प्रतिमा मिळवून संबंधित ठिकाणाचे सविस्तर नकाशे तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली.

शशांक भूषण, संशोधक

कसे केले संशोधन?

संशोधकांनी उपग्रह प्रतिमा, भूकंपाच्या नोंदी आणि प्रत्यक्षदर्शींनी तयार केलेल्या व्हिडिओचा वापर केला. या सर्वांच्या मदतीने हिमकडा कोसळल्यामुळे तयार झालेल्या प्रवाहाचे संगणकीय मॉडेल तयार केले. संशोधकांनी या ठिकाणांचे नकाशे आणि छायाचित्रांची प्रलयापूर्वीच्या अवस्थेशी तुलना केली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *