चामिंडा वासचा शेवटच्या क्षणी राजिनामा, लंका क्रिकेटने म्हटले ‘मतलबी’

Featured महाराष्ट्र
Share This:

 

मुंबई (तेज समाचार डेस्क): श्रीलंकेचा यशस्वी जलद गोलंदाज चामिंडा वास (Chaminda Vaas) याने मानधनाच्या मुद्द्यावरुन मतभेद झाल्याने श्रीलंकन क्रिकेट संघाच्या जलद गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा (Bowling Coach) राजिनामा दिला आहे. डेव्हिड साकेर (David Saker) यांनी वैयक्तिक कारणांमुळे या पदाचा राजिनामा दिल्यानंतर श्रीलंका क्रिकेट मंडळाने (SLC) तीन दिवसांपूर्वीच चामिंडा वासची या पदावर नियुक्ती केली होती आणि तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर लंकन संघासोबत जाणार होता पण संघ दौऱ्यावर रवाना होण्याच्या काही तास आधीच वासने आपण हे पद स्विकारु शकत नसल्याचे श्रीलंका क्रिकेट मंडळाला कळविले आहे.

अगदी शेवटच्या क्षणी वासने कळविलेल्या या निर्णयाबद्दल लंका क्रिकेट मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे तर वासने म्हटलेय मी एसएलसीकडे नम्रपणे एक विनंती केली आहे पण त्यांनी ती फेटाळली आहे. सद्यस्थितीत मी एवढेच सांगू शकतो. न्यायाचा विजय होईल. 26 मार्चपासून वास ही जबाबदारी सांभाळणार होता.

यासंदर्भात एसएलसीने एक पत्रक जारी करुन चामिंडा वासच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यात त्यांनी म्हटलेय की, सद्यस्थितीत जगभरात आर्थिक समस्या असताना वास यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी संघ रवाना होण्याच्या दिवशी अचानक बेजबाबदार पाउल उचलले आहे. श्रीलंका क्रिकेट आणि श्रीलंका जनता यांच्यात देशासाठी चांगली कामगिरी केलेल्या वासप्रती सम्मान आहे. त्याने केलेल्या देशसेवेचा वेळोवेळी यथोचीत सन्मान करण्यात आलेला आहे. अशास्थितीत त्याने प्रशासन, क्रिकेटपटू आणि खेळालाच वेठीस धरणे अयोग्य आहे. त्यांची वाढीव मानधनाची मागणी अवाजवी आहे. वास्तविक श्रीलंका क्रिकेटचे ते करारबध्द कर्मचारी आहेत. त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार आधीच मानधन मिळत आहे. याशिवाय त्यांना विंडीज दौऱ्यावर दैनिक भत्ते इतर सर्व सदस्यांप्रमाणे मिळणारच होते.

श्रीलंका क्रिकेटची ही प्रतिक्रिया लंकन क्रिकेटप्रेमींना काही रुचलेली नाही. त्यांनी म्हटलेय की, परदेशी प्रशिक्षकांना भरमसाठ रक्कम मोजताना आपल्याकडील मंडळींनाही तसेच मानधन द्यायला हरकत नसावी मात्र वासने अगदी शेवटच्या क्षणी आपला राजिनामा देणे हेसुध्दा चुकीचे असल्याचे क्रिकेटप्रेमींनी म्हटले आहे.

वासने याच्याआधीसुध्दा 2013, 15 आणि 2017 मध्ये लंका क्रिकेटसाठी प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली आहे. श्रीलंका क्रिकेट अकादमीतही त्याने जलद गोलंदाजांना प्रशिक्षण दिले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *