
‘बुलाती है मगर जाने का नहीं’ – प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांचं निधन
इंदौर (तेज समाचार डेस्क) : प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे. ते ७० वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात त्यांना रविवारी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना करोनाची लागण झाली होती. “त्यांना आज दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली”, अशी माहिती अरविंदो रुग्णालयाचे डॉक्टर विनोद भंडारी यांनी दिली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहत इंदौरी यांनी ट्विट करत सांगितलं होतं, “कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी करोना चाचणी करण्यात आली. करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला अरविंदो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आजाराचा मी लवकरात लवकर पराभव करावा, अशी प्रार्थना करा. आणखी एक विनंती आहे, मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करु नका, माझ्या प्रकृतीची माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळेल.”
इंदौरी हे एक लोकप्रिय शायर असण्यासोबतच ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकारही होते. राहत इंदौरी यांनी बरकतुल्लाह विद्यापीठातून उर्दूमध्ये एमए केले होते. त्यानंतर भोज विद्यापीठातून त्यांनी उर्दू साहित्यामध्ये पीएचडी केली. राहत यांनी मुन्नाभाई एमबीबीएस, मीनाक्षी, खुद्दार, नाराज, मर्डर, मिशन काश्मीर, करीब, बेगम जान, घातक, इश्क, जानम, सर, आशियां आणि मैं तेरा आशिक सारख्या सिनेमांसाठी गाणी लिहिली आहेत.
राहत इंदौरी यांचा जीवन प्रवास
राहत इंदौरी यांचा १ जानेवरी १९५० रोजी एका गरीब घरात जन्म झाला होता. राहत यांचे वडील रिफअत उल्लाह १९४२ मध्ये सोनकछ देवास जिल्ह्यातून इंदुर इथं आले आणि स्थायिक झाले. राहत याचे लहानपणीचे नाव कामिल होते. नंतर ते बदलून राहत उल्लाह ठेवण्यात आले होते.
राहत इंदौरी याचं आयु्ष्य खडतर आणि संघर्षमय होतं. त्यांचे वडील हे रिक्षा चालवून घराचा उरनिर्वाह करत होते. त्यानंतर त्यांनी मिलमध्येही काम केले होते. १९३९ ते १९४५ च्या दुसऱ्या महायुद्धात जगभरात आर्थिक मंदीची लाट आली होती. त्यामुळे मिल बंद पडली. त्यामुळे राहत इंदौरी यांच्या वडिलांची नोकरी गेली. त्यामुळे राहत यांच्या कुटुबीयांना बेघर होण्याची वेळ आली होती.