
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीची आंधळ्याची भूमिका
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीची आंधळ्याची भूमिका
बोर्डापेक्षा कमी भावात केळी खरेदी करुन शेतकऱ्यांची आर्थिक लूट
शेतकऱ्यांना केळीचे पेमेंट बोर्ड भावाने पाहिजे.
यावल ( सुरेश पाटील ) : तालुक्यात केळी भावाचा बोर्ड प्रतिक्विंटल 700 ते 750 रूपये दर असताना केळीचे अनेक धूर्त आणि संधी साधू व्यापारी मात्र शेतकऱ्यांच्या मजबुरीचा आणि कोरोनाविषाणू संदर्भातील परिस्थितीची पुरेपूर संधी साधून तसेच केळी तात्काळ खराब होत असल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रतिक्विंटल फक्त 500 ते 550 रूपये भाव दिला जातो तो सुद्धा उधारीच्या बोलीवर देत असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे त्यामुळे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने आंधळे असल्याची भूमिका सोडून शेतकऱ्यांना केळी पिकाचे पेमेंट केळीचे व्यापाऱ्यांमार्फत बाजार समितीच्या माध्यमातून केळी भावाच्या दररोजच्या बोर्ड नुसार तथा समक्ष करायला पाहिजे असे तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तसेच पारदर्शीपणे केळीचा व्यापार करणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा बोलले जात आहे.
यावल कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात बाजार समितीच्या वजन काट्यावर दररोज सकाळी केळी व्यापाऱ्यांचे खाली ट्रकचे वजन करण्यासाठी आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतातून केळी मोजून त्या एका ट्रक मध्ये किती क्विंटल केळी भरली याचे वजन करण्यासाठी तो ट्रक पुन्हा बाजार समिती आवारात वजन काट्यावर येत असतो अशा प्रकारे बाजार समितीत केळी व्यापाऱ्याच्या केळीच्या ट्रकची नोंदणी होत असते, केळी भावाचा बोर्ड सुद्धा यावल बाजार समिती केळी व्यापारी आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या माहितीसाठी दररोज प्रसिद्ध करीत असते, केळी भावाचा बोर्ड जाहीर केल्यानंतर सुद्धा काही धूर्त आणि संधी साधू केळीचे व्यापारी शेतकऱ्यांना जाहीर बोर्ड भावाप्रमाणे शेतकऱ्यांची केळी न कापता, भाव न देता 200 ते 250 रूपये कमी दराने केळी खरेदी करीत असतात आणि हा सर्व खेळ बाजार समितीचे सचिव आणि संचालक मंडळाच्या साक्षीने सुरू असल्याचे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आणि आता काही केळी व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा बोलले जात आहे बोलले जात आहे.
जाहीर बोर्ड पेक्षा कमी भावात केळी खरेदी केल्यास केळी व्यापाऱ्यांवर थेट फौजदारी दाखल करू किंवा केळी व्यापार्यांचा परवाना रद्द करू अशी प्रसिद्धी यावल बाजार समितीने गेल्या एक दीड महिन्यापूर्वी केली होती आणि आहे परंतु प्रत्यक्षात यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने काहीही कार्यवाही न केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत.
त्यामुळे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत असून बाजार समिती सचिव आणि सभापती यांनी शेतकऱ्यांना खरा न्याय मिळवून देण्यासाठी आंधळ्याची भूमिका सोडून शेतकऱ्यांना त्यांचे केळीचे पेमेंट दररोजच्या बोर्ड भावाप्रमाणे केळी व्यापार्यांकडून बोर्डाच्या भावानुसार देण्याची प्रत्यक्षात कृती करावी म्हणजे रोजच्या केळी भावाच्या बोर्डा नुसार केळी व्यापारी शेतकऱ्यांना जे पेमेंट करतील त्याचा धनादेश किंवा शेतकऱ्याला तो केळी व्यापारी किती रक्कम देत आहे याची नोंद बाजार समितीत झाल्यास पारदर्शी व्यवहार होतील असे तालुक्यातील अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
यावल येथून दररोज केळीचे ट्रक भरून मध्यम प्रतीची केळी उत्तर प्रदेशात तर चांगल्या प्रतीची केळी काश्मीर, राजस्थान, पंजाब, हरियाणा इत्यादी राज्यांमध्ये केळी व्यापारी पाठवीत असतात, बाहेर राज्यातील काही व्यापारी केळीच्या व्यापाऱ्यांना केळीचे पेमेंट कमी देत असल्याचे कारण सांगून केळी व्यापारी शेतकऱ्यांना बोर्ड भावापेक्षा 200 ते 300 रुपये कमी दराने पेमेंट करीत असतात, केळीचे काही व्यापारी तर केळी मोजताना मापात पाप करून शेतकऱ्यांचा अंदाजे पाच ते दहा क्विंटल केळी चामाल जास्त घेत असतात ही वस्तुस्थिती यावल कृषी उत्पन्न बाजार समिती व यावल तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना माहिती असतानासुद्धा सर्रासपणे शेतकऱ्यांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात होत आहे याकडे बाजार समितीचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने शेतकरीवर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तरी यावल तालुक्यातील लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून यावल कृषी उत्पन्न बाजार समिती, केळी उत्पादक शेतकरी, आणि पारदर्शी प्रमाणेच केळीचा व्यापार करणाऱ्या केळी व्यापारी यांची एक संयुक्त समिती स्थापन करून केळी व्यापारी व केळी उत्पादक शेतकरी यांच्यात समन्वय साधून शेतकऱ्यांना बोर्ड भावाप्रमाणे केळीचे पेमेंट कसे करता येईल याबाबत ठोस निर्णय घ्यायला पाहिजे अशा अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहेत.