
महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपा राज्यभर जनजागृती करणार
नवी मुंबई – राज्यातल्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा विश्वासघात करून सत्तेत आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाआघाडी सरकारने जनतेची घोर फसवणूक चालविली आहे. या फसवणुकीच्या विरोधात राज्यभर जनजागृती करून प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीने व्यक्त केला आहे, अशी माहिती भाजपाचे नेते मा.विनोद तावडे यांनी दिली. नवी मुंबई येथील नेरूळ येथे महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मा.तावडे हे पत्रकारांशी बोलत होते.
मा.तावडे म्हणाले की राज्यातील महाआघाडीच्या सरकारने पूर्वीच्या फडणवीस सरकारचे सर्व लोकोपयोगी निर्णय रद्द केले आहेत. त्यामध्ये दुष्काळी मराठवाड्यामधल्या जलयुक्त शिवार व वॉटर ग्रीड या महत्वाच्या योजनांचाही समावेश आहे. या महाआघाडी सरकारने कर्जमाफीचे निकष बदलून शेतक-यांची फसवणूक केली आहे. तर महानगरातील झोपडपट्टीवासीयांना 500 चौ.फुटाचे घर देण्याचे आश्वासन दिलेले असताना प्रत्यक्षात मात्र ते पाळलेले नाही. आपला कोणताही शब्द पाळायचाच नाही असे या सरकारचे धोरण असल्याची टीकाही मा.तावडे यांनी केली.
महाआघाडी सत्तेत आल्यानंतर राज्यातील महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या आणि सातबारा उतारा ऑनलाईन देण्याचे थांबविले आहे. सर्वस्तरावर भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. महाआघाडी सरकारच्या कारभाराचा फटका अवघ्या तीन महिन्यातच जनतेला बसू लागला आहे.
राज्यातील विविध प्रश्न व जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्दे घेऊन भारतीय जनता पार्टी जनतेत जाईल व जनजागृती करेल. असा निर्धार राजकीय ठरावाद्वारे करण्यात आला असे मा.तावडे यांनी सांगितले.
भाजपाच्या राज्यपरिषदेचे अधिवेशन नेरूळ येथे उद्या होणार आहे, असे सांगून मा.तावडे म्हणाले की, या अधिवेशनाला राज्यभरातून दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी व अन्य सर्व पदाधिकारी त्यामध्ये सहभागी असतील. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा हे अधिवेशनाचे उद्घाटन करणार असून माजी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस हे अधिवेशनाचा समारोप करणार आहेत.
या अधिवेशनात नवनिर्वाचित अध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील हे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांचे अध्यक्षीय भाषणदेखील त्याच वेळेला होईल, असेही मा.तावडे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, सहमुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आ.मंदाताई म्हात्रे, आ.गणेश नाईक, नवी मुंबई अध्यक्ष रामचंद्र घरत हे उपस्थित होते.