मोठा पडदा ते तिसरा पडदा- अमिताभचा अनोखा प्रवास

Featured इतर
Share This:

 

मुंबई (तेज समाचार डेस्क): सात हिंदुस्तानी या पहिल्या चित्रपटात छोटी भूमिका साकारून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणा-या अमिताभने मोठ्या पडद्यावर प्रचंड यश मिळवले आणि अजूनही तो कार्यरत आहे. केबीसीच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर प्रवेश केला आणि तेथेही स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. आणि आता आधुनिक युगाला साजेसा प्रवास अमिताभ सुरु करीत असून त्याचा गुलाबो-सिताबो हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर म्हणजेच तिस-या पडद्यावर १२ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.अमिताभने या चित्रपटात आपला आवाजही ३० वर्षानंतर बदलला आहे.

अमिताभ बच्चन. नाव काढताच त्याने रुपेरी पडद्यावर साकारलेली विभिन्न रुपे झरझर डोळ्यासमोरून सरकतात. मग त्यात जंजीरमधील विजय ते १०२ नॉटआऊट मधला १०२ वर्षाचा म्हातारा अशी रुपे समाविष्ट असतात. मोठ्या पडद्यावरील या शहेनशहाने बॉक्स ऑफिसवर कमालीचा धुमाकूळ घातला होता आणि घालत आहे. एक जमाना होता जेव्हा त्याच्या नव्या चित्रपटाच्या खेळाची तिकिटे मिळवण्यासाठी अमिताभ वेडे सकाळपासून रांग लावून उभे असत. आता मात्र अमिताभचा नवा चित्रपट चक्क घरात बसून फर्स्ट डे फर्स्ट शो पाहाण्याचे सौभाग्य लाभणार आहे. अमिताभचा आजवरचा प्रवास आता मोठा पडदा ते तिस-या पडद्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.

 

१२ जून रोजी अमेझॉन प्राईमवर प्रीमियर होणारा गुलाबो सिताबो अमिताभचा हा जसा पहिलाच चित्रपट आहे तसाच तो बॉलीवुडमधीलही पहिल्याच मोठ्या कलाकाराचा आहे. बरं असेही नाही की त्याचा गुलाबो सिताबो नवख्या निर्माता-दिग्दर्शकाचा आहे आणि नंतर चित्रपटगृहे मिळणार नाहीत म्हणून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जात आहे. अमिताभचे हेच वैशिष्ट्य आहे की तो स्वतःला बदलणा-या काळानुसार बदलवतो आणि म्हणूनच तो आजही टिकून आहे. याचे साधे उदाहरण म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यावर सर्वात जास्त सक्रिय असलेला अमिताभ हा एकमेव अभिनेता आहे. त्याच्या प्रत्येक पोस्टवर माध्यमांची नजर असते आणि आपल्याला अंधुक दिसते पासून रामचरितमानसमध्ये काय वाचले आवडले ते अमिताभ पोस्ट करतो आणि त्याच्या बातम्या होतात.

गुलाबो सिताबोचा दिग्दर्शक आहे शुजित सरकार. ज्याने विकी डोनर, मद्रास कॅफे, पिकु, ऑक्टोबर असे वेगळ्या विषयावरचे चांगले चित्रपट दिले आहेत. तोच गुलाबो सिताबो हा एक वेगळा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर आला आहे. गुलाबो सिताबो हा लखनऊमधील पपेटचा खेळ असून गुलाबो आणि सिताबो एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढत एकमेकांना चापट्या मारत असतात. प्रेक्षक हे पाहाताना हसतात. हीच थीम घेऊन शुजित सरकार ने अमिताभ आणि आयुष्मान खुराना यांना गुलाबो आणि सितोबोच्या रुपात आणले आहे. म्हाता-या मिर्जाच्या (अमिताभ) बंगल्यात बांके (आयुष्मान) भाडेकरू म्हणून राहायला येतो. त्याला घरातून काढण्यासाठी अमिताभ त्याचा कसा पदोपदी अपमान करतो आणि आयुष्मानही त्याला प्रत्युत्तर कसा खेळ रंगवतो ते शुजित ने या चित्रपटात मनोरंजकपणे मांडले आहे.

वेगवेगळे प्रयोग करणा-या अमिताभने अग्निपथमध्ये खर्जातला वेगळा आवाज काढला होता. प्रेक्षकांना तो आवडलाही होता.त्यानंतर आता ३० वर्षानंतर अमिताभने पुन्हा एकदा गुलाबो सिताबोमध्ये वेगळ्या आवाजाने प्रेक्षकांसमोर येत आहे.
खरे तर हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता परंतु काही कारणामुळे त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले. त्यानंतर १७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता परंतु कोरोनामुळे लादल्या गेलेल्या लॉकडाऊनने चित्रपटाच्या प्रदर्शनावर सावट निर्माण झाले. लॉकडाऊन उठल्यानंतर चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार निर्मात्यांचा होता. परतु लॉकडाऊन उठल्यानंतर मनोरंजन हे शेवटच्या स्थानावर राहाणार असल्यानेही चित्रपटगृहात प्रेक्षक चित्रपट पाहायला येतील याची खात्री कोणालाही नाही. त्यामुळेच निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्याचे ठरवले. काही वर्षांपूर्वी कमल हसनने आपल्या नव्या चित्रपटाचा प्रीमियर छोट्या पडद्यावर करण्याचे ठरवले होते. मात्र त्याचा चित्रपट पाहाण्यासाठी ५०० रुपये मोजावे लागणार होते. अनेक वितरकांनी याला विरोध तर केलाच परंतु ही योजनाही अयशस्वी ठरली होती. मात्र आता ओटीटीसाठी प्रेक्षक हजारो रुपये सहज मोजत आहेत.

खरे तर अमिताभच्या जागी दुसरा एखादा कलाकार असता तर त्याने याला मान्यता दिली नसती. तसेही अनेक मोठ्या नायकांनी आपले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याऐवजी वर्षभर थांबण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अमिताभ हा अमिताभ आहे म्हणूनच मोठा पडदा ते तिसरा पडदा असा प्रवास तो यशस्वीपणे करताना दिसत आहे.

 

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *