
अवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत
अवैध गौण खनिज कारवाईत मोठी तफावत.
प्रांताधिकारी यांच्याकडून यावल तहसीलदार महेश पवार यांना 2 वेळा कारणे दाखवा नोटीस.
यावल (सुरेश पाटील): अवैध गौण खनिज कारवाईत तफावत आढळून आल्याच्या कारणावरून फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी यावल तहसीलदार महेश पवार यांना गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा कारणे दाखवा नोटीस दिली चौकशीअंती तहसीलदार महेश पवार यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही होणार आहे किंवा नाही याकडे संपूर्ण राजकारणाचे,अवैध वाळू करणाऱ्यासह तालुक्याचे लक्ष वेधून आहे.
उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी दि.21ऑक्टोंबर 2021व दि.29ऑक्टोबर 2021 रोजी यावल तहसीलदार महेश पवार यांना दिलेल्या कारणे दाखवा नोटीसीत म्हटले आहे की, दि.20ऑक्टोबर2021रोजी विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांची महसूल अधिकारी आढावा बैठक पार पडली सदर बैठकीस आपले कार्यालयाकडील मीटिंग नोट्स मागविण्यात आल्या होत्या, त्यामधील गौण खनिज कारवाईबाबत पडताळणी केली असता माहे सप्टेंबर,ऑक्टोबर या दोन महिन्यात यावल तालुक्यात फक्त एक कारवाई झाल्याचे दिसून आले,तहसील कार्यालय रावेर यांनी या दोन महिन्यात 15 कारवाया केलेल्या आहेत. यावरून असे निदर्शनास येते की आपण यावल तालुक्यात वसुली व गौण खनिज कारवाई करत नसल्याचे सिद्ध होते.
गौण खनिज कारवाई अत्यल्प प्रमाणात असल्याने वसुलीवर परिणाम होत आहे यावरून आपण आपले कामकाजात दिरंगाई करीत असल्याचे दिसून येते यावरून आपणा विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम,1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कार्यवाही का प्रस्तावित करण्यात येऊ नये? याबाबतचा लेखी खुलासा समक्ष दोन दिवसाच्या आत सादर करावा.
नोटीसचे अनुषंगाने खुलासा मुदतीत सादर न केल्यास याबाबत आपले काही एक म्हणणे नाही असे गृहीत धरून किंवा आपला खुलासा समाधानकारक नसल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील)नियम1979 चे कलम 5(1)(4) अन्वय कार्यवाही करून त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जळगाव (आस्थापना शाखा)यांच्याकडे पाठविण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी असे म्हटले आहे.
उपविभागीय अधिकारी यांनी पुन्हा दि.29/10/2021रोजी दिलेल्या कारणे दाखवा नोटीसीत म्हटले आहे की संदर्भीय प्रस्ताव क्र.1च्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता,अवैध गौण खनिज वाहतूक करणारे वाहनाचे आरसी बुक वरील चेसीस नंबर मध्ये तफावत दिसून येत असल्याने सदर मूळ प्रस्ताव आपले कडे फेर-चौकशीकामी पाठविण्यात आले होते.तसेच आपण संदर्भीय क्र.3अन्वये या कार्यालयात फेर चौकशी अहवाल सादर केला आहे. सदर अहवालात वाहन क्र.एम.एच.19-सी-7346व एम.एच.19-सी.जे.1820असे दोन वाहन क्रमांक नमूद आहे. तसेच चलना मध्ये वाहन क्रमांक नमूद नाही व चलनावर सक्षम अधिकारी यांची स्वाक्षरी नसल्याचे दिसून येते.
दक्षता व निरीक्षण पथकामार्फत अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्या वाहना बाबत दि.21/10/2021रोजी ईकडील कार्यालयाची गौणखनिज नोंदवहीची तपासणी केली असता वाहन क्र.एम.एच.19-सी.जे.1820 वाहन यापूर्वी सुद्धा अवैध गौण खनिज वाहतूक करीत असताना पकडल्याचे दिसून येते.तथापि आपण अनधिकृत उत्खनन करणारे वाहन हे दुसऱ्यांदा पकडलेले असून सुद्धा आपण आपल्या अहवालात कुठेही त्याबाबत नमूद केलेले दिसून येत नाही.तसेच सदर वाहन हे यापूर्वीसुद्धा सापडलेले आहे किंवा नाही याची शहानिशा न करता सदर वाहनाचे प्रस्ताव इकडील कार्यालयात पाठविले जातात.यावरून आपण कोणत्याही प्रकारचे कागद पत्राचे अवलोकन न करता मूळ प्रस्ताव अपूर्ण सादर करून आपण गौणखनिज या अतिसंवेदनशील विषयाकडे गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते,अनधिकृत उत्खनन करणार्या वाहनांचा परिपूर्ण स्वयंस्पष्ट अहवाल इकडील कार्यालयात सादर करीत नाही.
सदर बाब अतिशय गंभीर आहे व प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही यावरून तुम्ही कर्तव्यात नितांत सचोटी न राहता कर्तव्यात कसूर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत आपला लेखी खुलासा नोटीस मिळाले पासून तीन दिवसाच्या आत समक्ष उपस्थित राहून सादर करावा असे उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी दिलेल्या कारणे दाखवा नोटीस म्हटले आहे.
याबाबत यावल तहसीलदार महेश पवार यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे लेखी खुलासा सादर केला आहे किंवा नाही तसेच पुढील कार्यवाही काय होते याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.
मध्यस्ती दलालांची हिम्मत वाढली.
यावल तहसील कार्यालयात विविध आणि अतिमहत्त्वाची कामे करण्यासाठी प्रामुख्याने शेतकरी किंवा शेतमजूर नसताना शेती खरेदी केलेल्या प्रकरणांमध्ये तसेच विकासकांनी बिनशेती प्रकरणांमध्ये बेकायदा अनधिकृत अतिक्रमण करून केलेल्या कामांच्या झालेल्या तक्रारीबाबत अवैध वाळू वाहतूक प्रकरणात तडजोडी करण्यासाठी तसेच चौकशी प्रकरणात तालुक्यातील काही दोन-तीन पंटर आणि मध्यस्थी दलाल हे संबंधितांशी संपर्क साधून यावल तहसीलदार कार्यालयात तुमचे काही काम असल्यास सांगा असे सांगत असतात यावल तहसील कार्यालयात या दलालांची हिम्मत कोणाच्या सहकार्याने, आशिर्वादाने वाढत चालली आहे. महसूलच्या आणि इतर काही अधिकाऱ्याबाबत वस्तुस्थितीजन्य वृत्त प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध झाल्यानंतर काही पंटर दमदाटीची आणि गुंडगिरीची भाषा सार्वजनिक ठिकाणी आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ठिकाणी वापरत असल्याने त्यांच्या मुजोरी विरोधात कारवाईसाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडे नावानिशी तक्रार केल्याचे सुद्धा बोलले जात आहे.याबाबत सुद्धा यावल तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत एका लोकप्रतिनिधीची मात्र जोरात बदनामी सुरू असल्याचे सुद्धा राजकारणात बोलले जात आहे.