
भरधाव रुग्णवाहिकेची 6 वाहनांना धडक
पिंपरी (तेज समाचार डेस्क) : भरधाव वेगात जाणाऱ्या रुग्णवाहिकेने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या सहा वाहनांना धडक दिली. यामध्ये सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री नऊ वाजताच्या सुमारास शिवतीर्थ नगर, थेरगाव येथे घडली.
कैलास विक्रम राऊत (वय 44, रा. शिवतीर्थ नगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम एच 42 / एम 1210 या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास आरोपी चालक रुग्णवाहिका घेऊन शिवतीर्थ नगर, थेरगाव येथून जात होता. भरधाव वेगात रुग्णवाहिका चालवून आरोपीने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या सहा वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटना घडल्यानंतर आरोपी रुग्णवाहिका चालक घटनास्थळावरून पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.