
भंडारा : गाडीच्या वादावरून मुलाने केली पित्याची हत्या
भंडारा (तेज समाचार प्रतिनिधि): दुचाकीच्या वादात मुलाने काठीने डोक्यावर प्रहार करून वडिलांचा खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथे घडली आहे. वडिलांचा खून करून मुलगा थेट पोलीस ठाण्यात पोहचला आणि एकच खळबळ उडाली. ताराचंद टिचकुले वय 52 वर्ष असे मृत वडिलाचे नाव आहे.
ताराचंद आणि मुलगा लोकेश ताराचंद टिचकुले (वय 21 वर्ष) यांच्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होते. लोकेश टिचकुले शेतातून घरी परत आला. येताच त्याने वडील ताराचंद यांना माझ्या दुचाकीची चाबी द्या असे म्हटले. वडिलांनी नकार देताच त्याने भांडण सुरु केले. वडिलांनी लोकेशला अंगणात पडलेली काठी उचलून मारहाण केली.
त्यामुळे संतप्त झालेल्या लोकेशने तीच काठी घेऊन वडिलांच्या डोक्यावर प्रहार केले. क्षणात वडील रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ताराचंद हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांना दोन मुले असून लोकेश हा लहान मुलगा आहे. नेहमी तो वडिलांसोबत वाद घालत असल्याचे सांगण्यात आले. हत्या केल्यानंतर आरोपीने स्व:ता लाखनी पोलीस स्टेशनला जात गुन्हा काबुल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.