औरंगाबाद : ट्रक चोरांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद, धुळे जिल्ह्यात वेगवेगळे करायचे सर्व भाग
औरंगाबाद (तेज समाचार प्रतिनिधि):औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना हायवा ट्रक चोरणारी आंतरराज्यीय टोळी पकडण्यात यश आले आहे. या टोळीकडून हायवा सह तब्बल 33 लाख 49 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सदर टोळीने महाराष्ट्र, गुजरात, झारखंड, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यात ही गुन्हे केले असून टोळी चा म्होरक्या अब्दुल कलाम सह दिवाकर चव्हाण, शुबसेन भाटिया, मोहम्मद सफार खान या आरोपींना पकडण्यात आले आहे.
तर याबाबत ची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली.
अब्दुल कलाम महंमद इस्लाम चौधरी (४०, रा. उडसाई, मेहेदराव, उत्तर प्रदेश, ह. मु. संग्रामपूर, गुजरात), दिवाकर ऊर्फ छोटू एकनाथ चव्हाण, शुबनेसकुमार दिनेशकुमार भाटिया (रा. गुजरात), मोहम्मद इस्तिखान मोहम्मद सफार खान (रा. गुजरात), शिवाजी अशोक लहिरे (रा. वांजरगाव, ता. वैजापूर) आणि त्याचा मेहुणा पिंटू ऊर्फ महेश भगवान बिरुटे ऊर्फ कहार (रा. अमरधाम, ता. नाशिक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १ जानेवारी रोजी संतोष सुखदेव बोरुडे (रा. डव्हाळा, ता. वैजापूर) यांचा हायवा चोरट्यांनी पळविला होता. अशाच घटना शेजारील जिल्ह्यातील विविध ठिकाणी घडल्या. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शेजारील विविध ठिकाणी वाहन चोरीसाठी चोरट्यांनी वापरलेली पद्धत जाणून घेतली.
यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा संशयावरून शिवाजी लहिरे याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याचा मेहुणा पिंटू ऊर्फ महेश आणि गुजरातमधील अब्दुल कलाम यांच्या सांगण्यावरून त्याने ट्रक चोरून नाशिक येथे नेल्याचे सांगितले.
नंतर हा हायवा कलामने साथीदारांसह धुळे जिल्ह्यात नेल्याचे समजले. पोलिसांनी कलाम, दिवाकर ऊर्फ छोटू, शुबनेसकुमार, मोहम्मद इस्तिखान यांना सुरतमधील इच्छापूर येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, औरंगाबादसह देशभरातील विविध राज्यांमध्ये ते वाहन चोरी करतात आणि धुळे जिल्ह्यात तसेच पंजाबमध्ये विक्री करतात.
धुळे जिल्ह्यात चोरीच्या वाहनांचे सर्व भाग वेगवेगळे केले जातात. यानंतर बऱ्याचदा हायवाच्या चेसीस आणि इंजिन क्रमांक बदलून नवीन क्रमांक टाकून बनावट कागदपत्रांच्या आधारे हायवा ट्रक पंजाब, हरियाणा राज्यांत कमी भावाने विक्री करतात. या टोळीने पंजाबमध्ये विक्री करण्यासाठी तयार केलेला बनावट चेसीस क्रमांक असलेला ट्रक पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केला. तर असेच अन्य दोन हायवा पंजाबमधील दिनानगर गावात उभे असल्याचे सांगितले. या टोळीतील गुजरातमधील चारही आरोपींविरुद्ध वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.