गावठी दारू माफियाचा पोलिसपथकावर प्राणघातक हल्ला

Featured जळगाव धुळे
Share This:

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). चाळीसगांव शहराजवळ बिलाखेड शिवारात गावठी दारूची हातभट्टी वर धाड टाकायला गेलेल्या पोलिसपथकावर एका महिलेसह चार लोकांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी पंडित पुंजू सोनवणे, प्रकाश उर्फ भु-या पंडित सोनवणे, प्रदीप पंडित सोनवणे, प्रमिलाबाई पंडित सोनवणे या चारही लोकांवर चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना बिलाखेड शिवारात गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलिसनाईक पंढरीनाथ पवार, विनोद भोई, कॉन्स्टेबल भटू पाटील, भूषण पाटील, राहुल गुंजाळ आणि वाहतूक शाखेच्या वंदना राठोड यांचे पथक तयार केले. हे पथक बिलाखेड शिवारातील खडकी रस्त्यावर पंडित सोनवणे यांच्या शेतात गेले असता काटेरी झुडपाच्या आडोशाला गावठी दारूची हातभट्टी असल्याचे निदर्शनास आले. या पथकाने तेथे छापा टाकला असता तेथील पंडित सोनवणे व प्रदीप सोनवणे हे दोघे पोलिसांना पाहून पसार झाले. या ठिकाणचा सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांनी पंचनामा करून 11 हजार 500 रुपयांचे दारू तयार करण्याचे रसायनासह साहित्य नष्ट केले.

– आरोपीला अटक करण्यावेळी झाला हल्ला
यासंदर्भात आरोपींना अटक करण्यासाठी बिलाखेडचे पोलिसपाटील गोकुळ पाटील यांच्यासह शहर पोलिसांचे पथक पंडित सोनवणे यांच्या घरी गेले असता तेथे उपस्थित प्रमिलाबाई सोनवणे (45) हिने उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यानंतर पोलिसपाटील यांनी घरात लपलेल्या आरोपींची ओळख पटल्याने त्यांना अटक करण्यासाठी घरात शिरताच यापैकी प्रकाश उर्फ भुऱ्या याने कॉन्स्टेबल भूषण पाटील यांचा शासकीय गणवेश फाडून गळ्यावर हाताने चापट मारली. तसेच येथे उपस्थित महिला प्रमिलाबाई हिनेदेखील महिला कॉन्स्टेबल वंदना राठोड यांना ढकलले. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पळून गेलेल्या आरोपिंचा शोध घेत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *