
शिरपूर येथे आजपासून पाच रुपये प्रमाणे तिन शिवभोजन केंद्रांचे सर्वसामान्यांसाठी खुले
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि ): येथील महाराजा कॉम्प्लेक्समधील पप्पाजी की थाली, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शिवभोजन केंद्राचे तसेच मांडळ रस्त्यावरील मैदानावर शासनमान्य शिवभोजन केंद्राचे उदघाटन आज करण्यात आले असून प्रत्येकी 5 रुपये प्रमाणे शासनमान्य दर आकारण्यात येणार आहे.
तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, मुख्याधिकारी अमोल बागुल, बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, नगरसेवक तपनभाई पटेल, गणेश साळवे, आमोदा तेलबिया सोसायटीचे व्हाईस चेअरमन यशवंत बाविस्कर, मंडळ अधिकारी के.पी.खैरनार, राजेश भंडारी, सोनू सोनार, मोहन पाटील, अशोक कलाल, सुनिल जैन, संजय चौधरी, भालेराव माळी, बालाभाई गुजराथी आदी उपस्थित होते.
आ. काशीराम पावरा म्हणाले की, कोरोनाच्या संकटाशी लढा देतांना सर्वांनी एकत्र यावे. आपल्या शेजारी कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घ्यावी. गरजू लोकांबाबत प्रशासनाला सूचित करावे.
नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल म्हणाल्या की, शिवभोजन थाळीचा 5 रुपये प्रमाणे लाभ घेतांना नियमांचे काटेकोर पालन करावे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आखलेल्या खुणांवर उभे राहावे. जेवणापूर्वी व नंतर साबणाने हात स्वच्छ धुवावेत, जेवतांना दोन खुर्च्यात पुरेसे अंतर ठेवावे, बाजारात अनावश्यक गर्दी करू नये. “पप्पाजी की थाली” येथे गेल्या काही वर्षांपासून गोरगरीब व गरजूंच्या सेवेसाठी चांगल्या जेवणाची व्यवस्था सुरूच आहे. यापुढे देखील शिवभोजन थाली 75 व्यक्तींसाठी पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर येणाऱ्या शेकडो लोकांना फक्त 5 रुपये प्रमाणे पप्पाजी की थाली येथील जेवणाचा लाभ देण्यात येईल. यासाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या.
तहसीलदार आबा महाजन म्हणाले की, गरजूंसाठी शहरात तीन केंद्रांवर प्रत्येकी 75 व्यक्तींना म्हणजेच एकूण 225 लोकांना दररोज पोटभर जेवणाचा लाभ दिला जाणार आहे. या केंद्रांसाठी भूपेशभाई पटेल व पालिकेने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.
यावेळी पप्पाची की थाली, बाजार समिती व मांडळ मैदानावरील तीनही शिवभजन केंद्रांवरील व्यवस्थेची पाहणी मान्यवरांनी केली. शिरपूर परिसरातील गोरगरीब व गरजू व्यक्तींसाठी ही व्यवस्था उपलब्ध करण्यात आल्याने आणण्यात सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले आहे.