
अश्विनकुमार यांची आत्महत्या, कर्कश भुंकणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी प्रश्न विचारायला हवा…
मुंबई (तेज समाचार डेस्क): सुशांतच्या आत्महत्येनंतर जे अनेक प्रश्न व शंका निर्माण केल्या गेल्या त्या अश्विनीकुमार यांच्याबाबतीतही निर्माण होऊ शकतात. अश्विनीकुमार का मरण पावले, हे रहस्य राहू नये. सी.बी.आय.चे माजी संचालक अश्विनीकुमार यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. त्यांचा मृत्यू का झाला हे रहस्य शोधण्यात कोणालाच रस नाही. काळ मोठा कठीण आला आहे हेच खरे, असे म्हणत शिवसेनेने या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कर्कश भुंकणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी आता या प्रकरणात प्रश्न विचारायला हवा, असेही सामना च्या अग्रलेखात म्हटले आहे.
सी.बी.आय.च्या प्रमुख संचालकपदी काम केलेली व्यक्ती नैराश्याने ग्रासते, जगण्यासारखे काही उरले नाही, आयुष्याचाच कंटाळा आलाय म्हणून आत्महत्या करते यावर आपण सगळे डोळे मिटून विश्वास ठेवतो, हे काही पटत नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काय म्हटलंय अग्रलेखात?
अश्विनीकुमार हे फक्त सी.बी.आय.चेच संचालक नव्हते तर निवृत्तीनंतर ते नागालॅण्ड आणि मणिपूरचे राज्यपालही होते. ते हिमाचल राज्याचे पोलीस महासंचालक होते. दिल्लीत प्रमुख राजकीय नेत्यांना विशेष सुरक्षा पुरवणाऱया एसपीजी गटात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. म्हणजे ते मनाने, शरीराने खंबीर होते व त्यामुळेच त्यांच्यावर सरकारने विशेष जबाबदाऱया सोपवल्या. अशी व्यक्ती अचानक आत्महत्या करते व त्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही याचे आश्चर्य वाटते.
अश्विनीकुमार यांना खरेच आयुष्याचा कंटाळा आला की त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, यावर सध्या हिमाचलात वास्तव्यास असलेल्या ‘नटी’ने भाष्य केले पाहिजे. अश्विनीकुमारांना कोणत्या परिस्थितीत आत्महत्या करावी लागली, हा प्रश्न कर्कश भुंकणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी विचारायला हवा. सुशांत प्रकरणात आत्महत्या नसून हत्याच आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्यांनी जिवाचा आटापिटा केला त्यांना सी.बी.आय.चे माजी संचालक अश्विनीकुमार यांच्या आत्महत्येमागे काहीतरी रहस्य आहे, कारस्थान आहे असे वाटू नये, हे गौडबंगाल आहे.