
कोरोनाकाळात पोलिसांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप-वाढदिवसानिमित्त आशुतोष जगदाळेचा विधायक उपक्रम!
कोरोनाकाळात पोलिसांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप; वाढदिवसानिमित्त आशुतोष जगदाळेचा विधायक उपक्रम!
निजामपूर-जैताणे (ता.साक्री, जि.धुळे) (वैभव करवंदकर ) :पार्श्वभूमीवर माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (तालुका – साक्री , जिल्हा – धुळे ) येथील आशुतोष जगदाळे ह्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व निजामपूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना सुमारे १०० मास्क (एन-९५ )व आयुर्वेदिक हँड सॅनिटायझरचे वाटप करून अनोखा वाढदिवस साजरा केला. आशुतोषच्या ह्या विधायक व अनुकरणीय सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आशुतोष व अनुराग ह्या दोन्ही भावंडांच्या हस्ते वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचारी, प्रभारी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सहाय्यक निरीक्षक सचिन शिरसाठ यांनी निजामपूर पोलीस स्टेशनतर्फे आशुतोषचा सत्कार केला व १९व्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. तर आरोग्य केंद्रातर्फे डॉ.स्वप्नील भदाणे यांनी आशुतोषला शुभेच्छा दिल्या. कोरोनाकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र जनतेची सेवा करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील आरोग्य, सफाई व पोलीस आदी फ्रंटलाईन वर्कर्सचे मनोबल वाढावे व त्यांना सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने हा छोटेखानी उपक्रम राबविण्यात आला. आरोग्य व पोलीस विभागातील सुमारे १०० कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ देण्यात आला.
सहाय्यक निरीक्षक सचिन शिरसाठ, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील भदाणे, डॉ.निकवाडे, सामाजिक कार्यकर्ते प्रा.भगवान जगदाळे आदींसह आरोग्य व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान याआधी आशुतोषचा लहान भाऊ अनुरागनेही वर्षभरात साचविलेल्या पैशांचा धनादेश कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधी म्हणून यापूर्वी दिला होता. आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, शिवचरित्र, महात्मा फुले समग्र वाड्मय आदी ग्रंथवाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप हे विधायक उपक्रम यापूर्वी राबविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आशुतोषने केकऐवजी टरबूज कापून निसर्गपूजक वाढदिवस साजरा केला. आशुतोष जगदाळे हा येथील आदर्श विद्या मंदिराचे इंग्रजी विषयाचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तथा पत्रकार प्रा.भगवान जगदाळे यांचा मोठा मुलगा आहे.