
अनिलभाऊ चौधरीचा ‘प्रहार जनशक्ती पक्षात’ प्रवेश
अनिलभाऊ चौधरीचा ‘प्रहार जनशक्ती पक्षात’ प्रवेश.
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी.
यावल (सुरेश पाटील): भुसावळ येथील माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या भेटीला गेले असता राजकीय चर्चेअंती त्यांनी त्यांच्या ‘प्रहार जनशक्ती’ या पक्षात अधिकृतप्ररित्या प्रवेश केला. अनिल चौधरी यांनी आपली राजकीय कारकिर्द शिवसेनेपासून सुरू केली होती.यानंतर ते दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिले.सन2010चे अखेरीस झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देखील दिली होती.मात्र यात ते पराभूत झाले होते.यानंतर ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले होते.तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांचे ते खास विश्वासू सहकारी म्हणून मानले जात होते.2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल चौधरी यांनी रावेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती.यातही त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला आणि भाजपला जोरदार टक्कर दिली ही वस्तुस्थिती संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात नागरिकांना चांगल्या प्रकारे ज्ञात आहे,नागरिकांच्या,राजकीय विश्लेषकांच्या अपेक्षे पेक्षा जास्त मते मिळाली परंतु त्यांचा काही हजाराच्या फरकाने पराभव झाला.गेल्या काही दिवसांपासून अनिल चौधरी हे शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा होती.आगामी
नगरपालिका निवडणुकीत ते भुसावळात शिवसेनेचे नेतृत्व करतील अशी चर्चा देखील रंगली होती.परंतु आज दि.28 सोमवार रोजी त्यांनी अचानकपणे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची अमरावती येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा करून ‘प्रहार जनशक्ती’ पक्षात अधिकृत रित्या प्रवेश केला. अनिलभाऊ चौधरी यांनी शेतकऱ्यांचे कैवारी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज प्रहार जनशक्ती पार्टीत प्रवेश केल्याने शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अनिलभाऊ यांना संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पक्षाचे संघटन व भक्कम फळी निर्माण करण्याची जबाबदारी दिली आहे. अनिलभाऊ यांच्या कौतुकास्पद निर्णयामुळे संपूर्ण भुसावळ विभागाचे राजकीय समीकरण बदलणार असे समाजा समाजात व राजकारणाच बोलले जात असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.