
कर्ज फेडण्यासाठी अनिल अंबानी यांनी घेतला ‘हा’ निर्णय
मुंबई (तेज समाचार डेस्क): अनिल अंबानी यांनी आपल्यावर असलेला कर्जाचा बोजा फेडण्यासाठी आपल्या दोन वीज कंपन्यांमधील मोठा हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर ब्रुकफिल्ड अॅसेट्स मॅनेजमेंट, ग्रिनको एनर्जी, टोरंट पावर या कंपन्यांसह 8 कंपन्यांनी या व्यवहारात रस दाखवला आहे. अनिल अंबानी यांनी दिल्लीतील वीज वितरण करणारी कंपनी बीएसईएस आणि यमुना डिस्कॉम्समधील हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल अंबानी यांनी दोन्ही कंपन्यांमधील 51 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही कंपन्यांचे मिळून सध्या 44 लाख ग्राहक आहेत.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहाचा भाग असलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरशी निगडीत असलेल्या या दोन कंपन्यांमधील हिस्सा विकण्यासाठी केपीएमजीला हायर केलं आहे. केपीएमजीला खरेदीदार शोधण्यासह हा व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारीही सोपवण्यात आल्याची माहिती आहे.