
पुणे : पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची रॅली काढणं अंगलट; पोलिसासह 8 जणांना अटक
पुणे | लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुण्यातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. एवढंच नाही, तर आता कारागृहातून सुटलेल्या आरोपींची रॅली काढण्यासही सुरुवात झाली आहे. येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपींची रॅली काढण्यात आली होती.
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी समीर मुलानी आणि जमीर मुलानीची रॅली निघाली होती. रॅलीत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेतील पोलीस शरीफ मुलानीचाही सहभाग होता. याप्रकरणी पोलिसांनी शरीफसह आठ जणांना अटक केली आहे.
येरवडा कारागृहाच्या बाहेर आरोपींची रॅली निघाली होती. फॉर्च्युनर, स्विफ्ट आणि स्कॉर्पिओसह आरोपींचा ताफा निघाला. या ताफ्याबरोबर 20 ते 25 दुचाकींवर 30 ते 40 जणांचे टोळके गोंधळ घालत सहभागी झाले होते. आरोपीचे भाऊ नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी रॅली काढली होती. बेकायदा जमाव जमवून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवला. रॅलीतील हुल्लडबाजांनी मास्कही वापरला नव्हता.
याबाबतची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी गाड्यांमध्ये एका गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतूस लोखंडी बार जप्त केला. कारवाईत 8 जणांना अटक झाली असून मुख्य आरोपीसह इतर आरोपी फरार आहेत.