अमरावती : डोळ्यात मिरची पावडर फेकून 19 लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न

Featured महाराष्ट्र
Share This:

अमरावती  (तेज समाचार डेस्क): भरभक्कम रक्कम घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न अमरावतीमध्ये करण्यात आला होता. बुधवारी सकाळी श्याम चौकात साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यात चोरट्यांनी मनोज चौधरी या व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून पैसे पळवण्याचा प्रयत्न केला. परंतू चोरांच्या हातात अखेर काहीच सापडलं नाही.

मनोज चौधरी हे दुचाकीने श्याम चौकातील स्टेट बँकेमध्ये रक्कम भरण्यासाठी निघाले होते. ते मनी ट्रान्सफरची कामे करतात. त्यावेळी मनोज चौधरी यांच्या बॅगमध्ये तब्बल 19.50 लाख रुपये होते. श्याम चौकात पोहचताच लुटारूंनी त्यांच्या डोळयात मिरची पावडर फेकून ही रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. पण श्याम चौधरी यांनी रक्कम चोराच्या हाती लागू दिली नाही. मनोज यांनी कोणाच्याही मदतीशिवाय हा हल्ला परतवून लावला. त्यानंतर त्यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला.

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी चालू केली आहे. तर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवला आहे. या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी लुटारूंच्या शोधात फ्रेजरपुरा, कोतवाली, गाडगेनगर, राजा पेठ आणि बडनेरा या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे 40 ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत.

दरम्यान, शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर CCTV च्या आधारे अनिकेत ज्ञानेश्वर जाधव , साहील नरेश मेश्राम  आणि यश सुनील कडू या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर पोलीस आणखी एका आरोपीच्या शोधात आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *