जळगाव: स्वस्त धान्य दुकानांच्या वेळा निश्चितनागरीकांनी धान्य घेतांना गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे

Featured जळगाव
Share This:

स्वस्त धान्य दुकानांच्या वेळा निश्चित

नागरीकांनी धान्य घेतांना गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल 

जळगाव (तेज समाचार डेस्क) : अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाथार्थ्याना तसेच एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांसाठी कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत शासनाने आधी घोषित केल्याप्रमाणे एप्रिल, मे आणि जुन, 2020 चे धान्य एकत्रितपणे मिळणार होते. परंतु आता नवीन निर्देशानुसार या तीनही महिन्यांचे धान्य त्या-त्या महिन्यातच वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली आहे.
         माहे एप्रिल-2020 करीता अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना विहीत अन्नधान्य रास्त भाव दुकानातून देण्यात आले आहे. याच लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत तांदूळ देखील माहे एप्रिलकरीता उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तर माहे मे आणि जुनकरीता अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना विहीत अन्नधान्य आणि मोफत तांदूळ माहे मे आणि जूनमध्ये उपलब्ध होणार आहे.
  ज्या लाभार्थ्यांचे अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनांच्या लाभार्थी यादीत नाव नाही अशा केशरी शिधापत्रिकाधारकांना देखील आता माहे मे आणि जुनमध्ये 8 रुपये प्रति किलो दराने गहू, प्रती सदस्य 3 किलो आणि 12 रुपये प्रति किलो दराने तांदूळ, प्रती सदस्य 2 किलो असे एकूण 5 किलो धान्य प्रति सदस्यास मिळणार आहे. सदरचे धान्य हे मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात संबंधित रास्त भाव दुकानातून उपलब्ध होणार आहे. तसेच माहे जुनमध्ये देखील याचप्रमाणे अन्नधान्य मिळणार आहे.
  पात्र लाभार्थ्यांना धान्य वाटपासाठी सर्व स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत व दुपारी 4ते रात्री 10 वाजेपर्यंत उघडी रहातील. तेव्हा लाभार्थ्यांनी आपआपले धान्य घ्यायला जातांना गर्दी न करता मर्यादित अंतर राखूनच स्वत:ची आणि इतरांचीही काळजी घ्यावी. जे कोणी या नियमांचे पालन करणार नाही तसेच गर्दी करुन गोंधळ निर्माण करतील. त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात येतील. असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *