पुरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ मोठे निर्देश

मुंबई
Share This:

मुंबई (तेज समाचार डेस्क): गेल्या 6 दिवसात महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली. तर काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचा पुरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यात त्यांनी कोकणातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्तांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

खचलेल्या रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करून वाहतूक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर, नादुरुस्त ट्रान्सफाॅर्मर्स आणि वीज मनोऱ्यांची वेगाने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. त्याचबरोबर पाणी पुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तर साथीचे रोग पसरू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी. स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाय, कीटकनाशकांची फवारणी यावर भर द्या, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

नुकसानीची आकडेवारी आणि करण्यात येणाऱ्या मदतीचा तपशीलवार अहवाल तयार करा, म्हणजे नुकसानग्रस्तांना वेळेत व तातडीने मदत मिळेल. पुराचा फटका बसलेले व्यापारी आणि व्यावसायिकांची माहिती एकत्र करून कशाप्रकारे मदत करता येईल, याचा प्रस्ताव तयार करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, येत्या काळात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास काय उपाय योजना करण्यात येईल, याबद्दल देखील मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

डोंगराळ भागातील खचणारे रस्ते, पायाभूत सुविधांबाबत सर्वंकष आराखडा तयार करण्यास सांगितले आहेत. कोकणात 26 नद्यांची खोरे असून याठिकाणी पुराबाबत इशारा देणारी ‘आरटीडीएस’ यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित करा. जलसंपदा विभागाकडून पहिल्या टप्प्यात सात नद्यांवर येत्या तीन महिन्यात अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *