वेश बदलून महिलेसोबत गोव्याला निघालेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Featured महाराष्ट्र
Share This:

पिंपरी (तेज समाचार डेस्क): अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना वर्षभरापूर्वी भोसरी परिसरात घडली होती. त्यातील आरोपी हा पिडीत मुलीचा सावत्र बाप होता. मागील वर्षभरापासून फरार असलेल्या नराधम बापावर भोसरी पोलीस लक्ष ठेऊन होते. आरोपी वेश बदलून एका महिलेसोबत गोव्याला जाण्याच्या तयारीत असताना भोसरी पोलिसांनी त्याला पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली.

वर्षभरापासून पोलिसांना चकमा देत असलेल्या 40 वर्षीय सावत्र बापाला अटक केली आहे. त्याने डिसेंबर 2019 मध्ये 15 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला होता.

मुलीचा खून केल्यानंतर आरोपी रिक्षातून पळून गेला होता. भोसरी पोलिसांनी सुमारे 800 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून रिक्षाचा माग काढून भूगाव येथून रिक्षा पकडली. मात्र आरोपी पोलिसांना मिळून आला नाही. भोसरी पोलीस त्याच्या मागावरच होते. दरम्यान, भोसरी पोलिसांना माहिती मिळाली की, हा आरोपी वेशभूषा बदलून एका महिलेसोबत गोवा येथे पळून जाण्याच्या तयारीत आहेत.

त्यानुसार पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशन, ससून हॉस्पिटल परिसरात सापळा लावला. आरोपी स्टेशन परिसरात आला असता पोलिसांनी त्याला ओळखले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले खोटे नाव अजय दिनानाथ चव्हाण असे सांगून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *