सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर आता अभय देओलचा धक्कादायक खुलासा
मुंबई (तेज समाचार डेस्क): सुशांतसिंग रजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक कलांकारांनी त्याच्यावर झालेल्या अन्यायाविरूद्ध वाचा फोडली. बॉलिवूडमध्ये घराणेशाही कशी चालते आणि इतर कलाकारांना कसं डावललं जातं, यावर कंगना राणावत, प्रकाश राजनंतर आता अभिनेता अभय देओलने सुद्धा खंत व्यक्त केली आहे.
इन्स्टाग्रामवर अभयने ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटाचा एक फोटो पोस्ट करत त्यावेळी घडलेल्या गोष्टी शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये अभय लिहितो, “या चित्रपटात हृतिक, फरहान, कतरिना आणि मी प्रमुख भूमिकेत होतो. मात्र प्रमुख भूमिकेच्या पुरस्कार सोहळ्यासाठी केवळ हृतिकला नामांकन देण्यात आलं. त्यावेळी पुरस्कार सोहळ्यात मला आणि फरहानला मुख्य अभिनेत्यांच्या नामांकनांमधून वगळून सहाय्यक अभिनेते म्हणून नामांकन देण्यात आलं.”
या इंडस्ट्रीमध्ये अशा पद्धतीच्या अनेक लॉबी आहेत ज्या तुमच्या पाठीमागे तुमच्या विरोधात काम करतात. या घटनेनंतर मी पुरस्कार सोहळ्यांवर बहिष्कार घातला, असं म्हणत अभयने राग व्यक्त केलाय. दरम्यान, सोनू निगमने देखील संगीत क्षेत्रात असे प्रकार घडत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. अनेक गायक यामुळे नैराश्यात आहेत, असंही त्यानं सांगितलं आहे.