
“महिलेला पुरुषी स्पर्शातून त्याचा हेतू कळतो” – उच्च न्यायालयाचे निरीक्षण
मुंबई (तेज समाचार डेस्क). कुठलाही पुरुषी एखाद्या महिलेला स्पर्श करतो किंवा तिच्याकडे पाहतो त्यावेळी संबंधीत महिलेला त्याचा हेतू लक्षात येतो असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने आज, मंगळवारी 3 मार्च रोजी नोंदवले. न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान हे निरीक्षण नोंदवले आहे.
उद्योगपती विकास सचदेव यांच्याविरोधात एका महिला कलाकाराचा विमानात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे. डिसेंबर 2017 मधील ही घटना आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले असून, तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याच शिक्षेला स्थगिती देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने शिक्षेला तूर्त स्थगिती दिली असून, त्यांची बाजू ऐकून घेण्यास होकार दिला. यावेळीच न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले.
भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 354 आणि पॉक्सो कायद्यातील तरतुदींनुसार न्यायालयाने विकास सचदेव यांना दोषी ठरविले आणि त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली. पण सत्र न्यायालयाने निकाल दिला त्याचदिवशी त्यांना जामीनही मंजूर केला. त्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा तीन महिन्यांसाठी स्थगितही केली. यानंतर 20 फेब्रुवारी रोजी त्यांनी या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.