लघुशंका करत असलेल्या 5 तरुणांवर कोसळला मृत्यु

Featured पुणे महाराष्ट्र
Share This:

लोणावळा (तेज समाचार डेस्क) खंडाळा बोर घाटात रविवारी रात्री पाच मित्रांवर मृत्यूने अचानक घाला घातला. अलिबाग येथे आपल्या दुचाकी वरून फिरण्यासाठी गेलेले काही युवक तेथून परतत असताना खंडाळा बोर घाटातील अंडा पॉईंट याठिकाणी लघुशंकेसाठी थांबलले असता, एका टेम्पो दुर्दैवीरीत्या त्यांच्या अंगावर येऊन पलटी झाल्याने ही घटना घडली.

रविवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास वरील घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव (ता.मावळ) एमआयडीसी मध्ये काम करणारे सहा युवक तीन दुचाकी (MH 14 CV 0243, MH 14 FK 4097 व MH 14 FH 5793 )घेऊन अलिबाग येथे फिरायला गेले होते. तेथून परतत असताना हे सर्वजण खंडाळा बोर घाटातील अंडा पॉइंट येथे रस्त्याच्या कडेला दुचाकी उभ्या करून लघुशंकेसाठी थांबले होते. त्याचवेळी अंडा पॉईंट येथे असलेल्या तीव्र उताराच्या पुलावरून पुणे बाजूकडून खोपोली कडे जाणारा आयशर टेम्पो (क्रमांक MH 46 BB 1830) चालकाचे नियंत्रण सुटल्याने या थांबलेल्या दुचाकींवर येऊन पलटी होऊन पडला. यावेळी आपल्या दुचाकी जवळ उभ्या असलेल्या या सहा मित्रांमधील पाच जण या टेम्पो खाली सापडून जागीच ठार झाले, तर एकजण लघुशंकेसाठी बाजूला गेलेला असल्याने सुदैवानं बचावला.

या अपघातात मृत झालेल्या युवकांची नावे प्रदीप प्रकाश चोले (वय- ३८), अमोल बालाजी चिलमे (वय-३०), नारायण राम गुंडाळे (वय -२८), गोविंद न्यानोबा नलवाड व निवृत्ती उर्फ अर्जुन राम गुंडाळे (वय-२८, सर्व रा- वंजारवाडी ता- अहमदपूर जि. लातूर, सध्या रा. वराळे फाटा, तळेगाव, पुणे) असे असून बालाजी हरिसचंद्र भंडारे (वय-३५) हा युवक या अपघातातून बचावला आहे. सदर अपघाताची खबर समजताच बोरघाट महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी ची देवदूत टीम यांनी घटनास्थळी पोचून मदतकार्य सुरू केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *